Wednesday, June 25, 2014

भूक

ती भर उन्हातून झपझप पावलं टाकत चालली होती. अनवाणी. डोळ्याभोवती मिठाची वर्तुळं दाटली होती. इतरवेळी रस्त्यातल्या कोणालाही तिची सहज कीव आली असती. मग एखाद्या माऊलीने तिला अगदी तुडुंब भरलेल्या गर्दीतूनही पाटीच्या आडोशाला बोलवून "कुठं ग अशी वणवण फिरतेस? शाळेला सुट्टी असेल तर घरी बसावं, आया-बाप्यांना मदत करावी. तर तुझ्या पायाला ही अशी भिंगरी चिकटलेली" म्हणून विचारपूस केली असती. पण आताशा तिलाही स्वतःच्या वेगळेपणाची जाणिव होऊ लागली होती. पूर्वी सकाळी डोकावणार्‌या कोवळ्या कवडशाचाही ती मनापासून तिरस्कार करत असे. पण आता, आणि विशेषतः आज एका पायाचा ओलसर ठसा पुढील पावलागणिक पिऊन टाकणारा ऊन्हाळाही तिच्या नजरेत येत नव्हता. नजरेला भारून टाकणारं एक मृगजळ तिच्यासाठी आसुसलं होतं... तिची वाट पहात होतं.

पूर्वी ती कधी अशी रडायला लागली की बाकी कोणी करो ना करो तिचा मन्या काका मात्र कायम तिला जवळ घ्यायचा. तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा, पाठीवर थोपटायचा, पापे घ्यायचा, आणि मग हातभर लांबीची चॉकलेट द्यायचा. तिला नेहमी वाटायचं, "खरंच! किती प्रेमळ आहे काका. माझी किती काळजी घेतो. उगाच नाही, घरी मी एकटी असले, तर मला भिती वाटेल म्हणून लगेच अगदी शेजारच्या घरी रहात असला तरी इथे येतो. माझी सोबत करतो." 

पण आज तिचा मन्याकाका सुद्धा नव्हता. खरं तर कोणीच नव्हतं. आई-बाबाही!

एक दिवस खेळता खेळता तिला चक्कर येऊन पडली। पुढचं काय ते तिलाही निटसं आठवत नाही. अचानक जाग आली तेव्हा घरभर अंधार पसरला होता. आई अस्ताव्यस्त रडत होती. बाबा उशाशी वाट बघत बसला होता. छताकडे बघत. तिने उठून बाबाला मिठी मारली, तशी बाबाने एखाद्या वाघासारखी डरकाळी फोडत ही हाणलीन तिच्या पाठीत... त्यानंतर ती फक्त "बाबा, बाबा" म्हणत घरभर मार चुकवत पळत राहीली. शेवटी मन्याकाका आलाच. पण यावेळी तो बाबाशी बोलला काहीतरी. बराच वेळ. आणि मग तिला स्कुटरीवर मागे बसवून रात्रीच्या अंधारातच निघाला. बरीच वळणं, आड-वळणं घेत कुठल्याश्या मंदीरात आला. नविनच कुठल्यातरी. "उगाचच कुठे काही बोलू नको. याद राख!" म्हणाला आणि निघून गेला. तो आलाच नाही परत.

या गावातली लोकं तिच्या ओळखीची भाषा बोलायचे, पण तिला काहीच समजायचं नाही. पुढे जसे दिवसावर दिवस चढत गेले, तशी तिची तीही गरज नाहीशी झाली. कारण 'हल्‌ हल्‌' शिवाय इतर काही ऐकूच येईनासं झालं. दिवस दिवस उपाशी रहायचं आणि अवचित कोणी जाता येता टाकलाच एखादा रुपया, एखादा लाडू, किंवा कधीतरी नुसताच चूरा खाऊन झोपायचं. त्यातही कधीमधी आसपासची मुलं "तू इथली नाही...", "जा... जा..." असं काहीतरी म्हणत दिलेलं हिसकावून घ्यायची. सुरुवातीला 'आई, आई' करत अख्खा गाव पालथा घालून झाला, पण ओळखीची एक खूण दिसायची नाही. नंतर नंतर रडण्यानेही तिला सोडून दिलं. दिवसभरच्या वणवण फिरण्याने आणि पोटात अन्नाचा तुकडा नाही. मग मधूनच तिला वरचेवर चक्कर येऊ लागली. उलट्यांचा त्रास सुरु झाला आणि अशक्तपणा जाणवू लागला. उठूनउठून घरच्या कोंबडीच्या रस्श्याची आणि बोरणआळीतल्या चिंचेची उबळ येऊ लागली.

आणि मग अचानक वाढत्या थकव्याविपरीत शरीर फळू लागलं. पूर्वी जे बापे प्रसाद द्यायला जवळ येत ते दुरुनच परतू लागले आणि बाया एकमेकींत "कसं काय कोण जाणे?" कुजबुजत चार आणे जास्त टाकू लागल्या.

आताआताशा चालणंही अवघड होऊन बसलं होतं. अशक्तपणामुळे पोटही मध्येच डुचमळून, पिळवटून निघायचं. असं वाटायचं की आतले अवयव, खल्लेले पदार्थ निखळून पडताहेत. एकमेकांवर आदळताहेत. एक दिवस हौदातलं पाणी पिताना असाच आचका बसला आणि तोल जाऊन खालीच पडली ती.

शुद्ध आली तेव्हा मंदीराबाहेरच्या झुडूपांमध्ये कच-याच्या ढिगा-यात असल्याची जाणिव झाली. खुप मेहनतीने उठली तेव्हा शेजारी एक छोटंसं बाळही कोणीतरी टाकून दिलेलं दिसलं. तिच्यासारखीच कोणीतरी असणार ती! काहीतरी मस्ती केली असणार. आणि म्हणून आईबाबाने केली असेल शिक्षा... पण ती खुष होती... कारण, आता तिला एक मस्त मैत्रिण मिळाली होती. अगदी तिच्या 'छकुली' सारखी. 

कित्ती वेळ खेळायची एकटीच ती छकुलीशी. अगदी आई धपाटा मारून नेईपर्यंत. जातानासुद्धा तिच्या छकुलीची जाला ठरलेली... इतर खेळण्यांपेक्षा वेगळी.... गादीवर!

पण ही छकुली मात्र वेगळी होती. मऊमऊ हात, छोटे छोटे केस... तिला हात लावला मात्र तशी ती रडायलाच लागली. आणि मग ते वाढतच गेलं... खूपच!... तेव्हाशी तिच्या लक्षात आलं... भूक!... भूक लागली असेल. लागलीच ती उठून समोरच्या दुकानाच्या दिशेने झेपावली खरी, पण लगेच भोवळ येऊन खाली पडली... उठली तेव्हा छकुली शांत झोपली होती. "झोपली असेल बिचारी"... "पण उठल्यावर पुन्हा भूक लागली तर?"...

"काका, एकच...", "निदान एक गोळी तरी द्या...", "एक्कच...", "मला नाही, माझ्या छकुलीला...",... "अक्का टाकू नको ना. मला दे!..." "अक्का... अक्का..." करत करत गावभर हिंडली. तिलाही कळेना, मधल्या काळात चांगल्या वागणा-या बायाही परत पूर्वीसारखं हुडूत्‌ हुडूत्‌ का करू लागल्या ते. शेवटी एका घराबाहेर पडलेला एक भाकरीचा तुकडा गावला. खारट सुजल्या डोळ्यांमध्ये एक चमक आली.

मध्यान्ह होती. कोणी पहूडलं होतं, कोणी नुसतंच विसावत होतं, कुठे गप्पाटप्पा रंगल्या होत्या, गुरं सावलीला पांगली होती. ती मात्र वा-यासारखी गल्लीगल्लीतून वळत मंदिराकडे झेपावत होती.

छकुली अजून झोपलीच होती. ती शेजारीच बसून राहीली. डोळा लागला तिचा. जाग आली तेव्हा पोटाची आतडी पिळवटली होती. हातातला भाकरीचा तुकडा अलगद तोंडाकडे वळला... "नाही!... नाही!" म्हणत तिने तो खाली टाकला. परत उचलला. "थोडंसच.".... "नाही! नको... मग छकुली काय खाईल?".... नंतर कितीवेळ त्या मांडीवरल्या हातातल्या तुकड्याकडे एकटक पहात बसली कोणास ठाऊक.

जाग आली ती हाताला बसलेल्या हिसक्यामूळे. हातात तुकडा नव्हता... कसा असणार? तो समोरच्या झाडावर बसलेल्या कावळ्याच्या चोचीत होता... ती सैरभैर झाली. हूं हूं करत धावली. "दे... दे...", "दे ना रे..." म्हणत... शेवटी थबकून बसली... रडणं काही आवरत नव्हतं.... "छकुलीचा तुकडा होता!"

"छकुली.... छकुली... आता तू काय खाणार गं? ... बघ ना कसा दुष्ट आहे... छकुली... बोल ना, छकुली... उठ ना गं... उठ ना... मलाही भूक लागलीय गं.... भूक.... भूक..."

पण, तिला कुठे कळायला.... की एका भूकेतून जन्माला आलेला तो जीव दुस-या भूकेने कधीच खाऊन संपवला होता!

No comments: