Thursday, August 14, 2014

चौकट



We place a spherical cage in the desert. enter it and lock it from inside. We then perform an (geometrical) inversion with respect to the cage. Now, the lion is inside and we are outside the cage. 
- (Mathematical methods for) How to catch a lion 



टेबलावरच्या ढिगा-यात कुठेतरी फोन खणखणला. 
“हॅलो! श्रीधर आपटे का?”
“हं”
“मी इन्पेक्टर जाधव बोलतोय. मला अापल्याला भेटायचं होतं”
श्रीधरने थोड्याशा वैतागलेल्या स्वरातचं विचारलं, “अगदीच जरूरी अाहे का भेटणं? urgent असेल तर इथंच बोलू, फोनवर”
“urgent तर अाहेच. किंबूहना थोडं जास्तच urgent आणि तितकच महत्त्वाचंही अाहे. फोनवर नाही बोलता येणार.” श्रीधरचा माणुसघाणा स्वभाव जाधवांना नवीन नव्हता. त्याच्या उत्तराची फार काळ वाट पाहून उपयोग नाही म्हणून त्यांनीच पुढे रेटलं, “ मग अाज संध्याकाळी येऊ?”.
श्रीधर अजूनही एखादा बहाणा चाचपडत असणार हे अोळखून शेवटी त्यांनी अाधी ठरवून ठेवलेली punchline टाकलीच, “अापला अंदाज बरोबर ठरला अाहे. अपेक्षित असलेली सिलीकॉन मुलद्रव्ये सापडली अाहेत”.
“काऽय?” जाधवांना वाटले श्रीधर बसल्या खुर्चीत फुटभर उंचं उडाला असावा, “संध्याकाळी नको, लगोलग निघून या. मी वाट बघतो अाहे. लवकर या”. 
“जरा तुमच्या A.C. चं temperature वाढवून ठेवा, please.” जाधवांनी फोन ठेवला.


श्रीधरच्या डोळ्यासमोर जून्या घटना एखाद्या चित्रपटासारख्या सरकू लागल्या. काही महिन्यांपूर्वी न्युयॉर्क शहरात भर उन्हाळ्यात अचानक वादळ अालं होतं. अाजकाल हवामान खात्याचे बहुतेक सर्वच अंदाज बरोबर येत असताना, असं घडणं सगळ्या वैज्ञानिक विश्वात खळबळ माजवून टाकणारं होतं. इतरवेळी श्रीधरच्या हे लक्षातही अालं नसतं. पण सुमारे सात महिन्यांपूर्वी मुंबईत घडलेल्या अशाच एका घटनेचा श्रीधर अभ्यास करत होता. दर वर्षी न चूकता भेट देणारे flamingoes या वर्षी फिरकलेचं नव्हते. श्रीधरला लवकरच या दोन्ही घटनांमधील समान घटकाची सांगड घालता अाली होती. Butterfly Effect! जगात एका जागी घडलेल्या एखाद्या नगण्य घटनेचा, उदा. फुलपाखराने एकदाच पंख फडकवण्यात केलेला सौम्य हलगर्जीपणा, प्रतिसाद काही काळानंतर कुठेतरी लांब दुसरीकडे उमटतो अाणि तेथील भविष्य पार बदलवून टाकतो, तोच हा butterfly effect. श्रीधरच्या अाकडेवारीनुसार मुंबईच्या अासपास शंभर किलोमिटरच्या परिसरात गेल्या एक-दोन वर्षात पृथ्वीच्या बाहेरून अालेलं काहीतरी अादळलं होतं. त्याचाच परीणाम नंतर न्युयॉर्क शहरात जाणवला होता, काहीशा वाढीव प्रमाणातच. अाणि त्यामुळेच पक्ष्यांनी मुंबईकडे पाठ फिरवली होती. त्यापदार्थाच्या गतिवरून आणि पृथ्वीतलावर पोहोचलेल्या अाकारमान-वस्तुमानावरून हा पदार्थ अाजही शाबूत असला पाहीजे अाणि अगदी समुद्रात पडला तरी तरंगला पाहीजे असं श्रीधरचं मत होतं. परंतू अशा कोणत्याही घटनेची नोंद न मिळाल्यामुळे श्रीधरला शंका होती, की हे एखादं अंतराळयान असावं अाणि ते परत गेलं नाही (हे ही त्याच्या अाकडेवारीनुसारच!) म्हणजे कदाचित एखादा एलियनही अासपास भटकत असावा. लागलीच त्याने जाधवांना फोन केला होता अाणि अापली शंका बोलून दाखवली होती. 


जाधवांच्या मते असा एलियन असता तर मुंबईसारख्या ठिकाणी अात्तापर्यंत कोणाच्या तरी सहज दृष्टीस पडला असता, “अाजकाल संजय गांधी पार्कातले बिबळेही अर्धावेळ IIT तच राहातात म्हणे. असा अचाट प्राणी लोकांच्या नजरेतून सुटू शकेल असं वाटत नाही.”
श्रीधरने ताडले की जाधव एखाद्या चित्रपटात दाखवलेला पाच-सहा हातांचा प्राणी किंवा अंडाकार डोकं अाणि मोठे काळेशार बदामी डोळे असलेल्या एलियनची कल्पना करत अाहेत. 
“तुम्ही एखाद्या विशिष्ठ जागी भेट द्यायला जाताना पुरत्या तयारीनिशी जाता ना?” स्वेटरची लावलेली बटणं पुन्हा पुन्हा चाचपडणा-या जाधवांना श्रीधर म्हणाला होता, “मग एवढ्या दुरून अालेला एका अतिप्रगत जमातीतील हा सदस्य तयारीनिशी अाला नसेल कशावरून? तो दिसाण्या-वागायला अगदी अापल्यासारखाच नसेल कशावरून?”. “मला तर वाटतं तो वरवर अगदी सामान्य मानव, किंबूहना अगदी बंबैय्याच दिसत असावा.”
“मग अशा माणसाला कसं काय शोधणार अापण?” काकुळतीला येत जाधवांनी सवाल केला.
“त्याच्या इतरांशी होणा-या देवाण-घेवाणीतून.” श्रीधरने याचा अाधीच विचार करून ठेवलेला होता. “बाहेरून जरी त्याने अापल्यासारखा पेहराव केला असला, तरी विज्ञाननियमाप्रमाणे अापलं निरिक्षण करण्यासाठी त्याला अापल्यापासून विभक्त होऊन असं काहीतरी करावंच लागेल. निरिक्षणासाठी त्याने स्वतःची अशी खास उपकरणं अाणलीही असतील, पण सगळ्यात लपवण्यास अवघड म्हणजे मिळवलेल्या माहितीचं देवाण-घेवाण तंत्र. म्हणूनच मी गेले दोन अाठवडे पृथ्वीवरून प्रसारीत होणा-या विद्युतचुंबकीय पटलाची इथंबूत मिमांसा चालवली अाहे.” 
“तिथे तर काही सापडलं नाही, पण अांतरजालावर (iternet) चाललेल्या घडामोडींमध्ये बघा काय सापडलं अाहे.” श्रीधरने एक अालेख जाधवांपूढे धरला होता.
लाल पिवळ्या निळ्या रंगात हजारों रेघा डावीकडून उजवीकडे वर खाली मिळेल त्या दिशेने रेखाटल्या अाहेत एकढेच जाधवांना समजले. असा अालेख शाळेत काढला असता तर मुलाला बेदम चोपला असता, एक विचार जाधवांच्या मनात सरकून गेला.
“पाहा, पाहा! अाहे की नाही गंमत?”
“अाहे खरी. पण…” 
जाधवांना काहीही समजलेलं नाही हे लक्षात घेऊन श्रीधरने समजवायला सुरूवात केली, “अहो, हा अालेख अाहे भारतातून आंतरजालावर होणा-या प्रत्येक तासाला होणा-या सरासरी माहिती वहनाचा. काही महत्त्वाचे सामाजिक प्रसंग सोडले, तर तसा तो अगदी सामान्य एकसुरी अाहे. हे मोठे-मोठे उंचवटे जगभरात घडलेल्या घटनांचे पडसाद अाहेत. अात्ताच झालेली सार्वत्रिक निवडणूक, friendship day, गणेशोत्सव वगैरे, वगैरे. पण या सगळ्यांपलिकडे असं इथे काहीतरी दिसतं अाहे.” जाधव मनापासून प्रयत्न करत होते. त्यांची त्रेधातिरपिट लपली नव्हती. “या सगळ्या ठळक वैशिष्ठ्यांमागे अगदी सुक्ष्म पण प्रचंड नियमीत एक लहर दिसेल तुम्हाला.”
“म्हणजे तो एलियन अापलंच internet network वापरून माहिती पाठवतो अाहे?” जाधव.
“नाही. त्यापेक्षाही अतर्क्य. ही माहीतीची देवाण-घेवाण वाटत नाही. दुस-याच कुठल्या तरी गोष्टीचा परीणाम दिसतो अाहे.”… “श्वासोत्छवास! अाणि इतरही बरंच काही! पण अगदी नियमीत.”
“म्हणजे? काहीच कळत नाहीये.” जाधव काहीसे निराशच झाले होते.
“अहो, यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे तो एलियन अाजही मुंबईतच अाहे. अाणि दुसरी म्हणजे….” “ तो सिलिकॉनचा बनलेला अाहे.”
जाधव तोंड उघडणारच होते, “सांगतो. अापण मुलतः कार्बन या अणूचा वापर करून जीवनावश्यक मुलद्रव्ये बनवतो. अापली प्रथिने, DNA, संप्रेरके, अगदी अापली त्वचा अाणि अापण खातो ते अन्नसुद्धा मुळात कार्बनचंच बनलं अाहे. थोडक्यात काय तर अापण कार्बनचे बनले अाहोत अाणि हा कोण तो एलियन अाहे, तो मात्र सिलिकॉनचा बनला अाहे.”
“हे शक्य अाहे?”
“अगदी सहज नाही, पण अशक्यही नाही. कोणत्याही अणूचे रासायनिक गुणधर्म ठरवते ते म्हणजे त्याच्या केंद्रकाभोवती फिरणा-या इलेक्ट्रॉन्सची रचना. त्याचे संयुज म्हणजे सर्वात बाहेरील कक्षेत फिरणारे इलेक्ट्रॉन्स. अाणि कार्बन अाणि सिलिकॉनमध्ये संयुज इलेक्ट्रॉन्सची संख्या एकच अाहे. त्यामुळे तत्त्वतः कार्बनपासून बनणारी बहूतेक सर्वच मुलद्रव्ये सिलिकॉनपासूनही बनू शकतात.”
“कमालीचं अाहे हे सगळं!”
“अाहे खरं. पण अापल्यालाही ही संकल्पना काही नविन नाही. अापणही चतुर, बुद्धीमान machines बनविण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून करतोच अाहोत की. अापल्याकडचे robots ते हेच. पण खूपच नैसर्गिकही. अापल्याकडच्या artificial intelligence चं natural रुप. मेख एकच अाहे. संयुज इलेक्ट्रॉन्स वरवर जरी समान दिसत असले तरी या अणूंच्या अांतरीक कक्षांमधला फरक त्यांच्या इतर गुणधर्मांत स्पष्ट जाणवतात…. असो, याबद्दल नंतर कधीतरी. थोडक्यात काय, तर अापला एलियन ब-याच अंशी अापल्यासारखाच असला तरी थोड्याफार फरकाने तो फारच वेगळा अाहे.”
“अाणि या फरकाचा वापर करून त्याला शोधणं सोप्पं जाईल. बरोबर?”
“बरोब्बर! उदाहरणार्थ, या सापडलेल्या लहरींच्या अभ्यासातून एक गोष्ट सिद्ध होतेय. या एलियनची जीवनप्रक्रीया अापल्यापेक्षा ज्या पटीने हळूवार चालते अाहे त्यावरून हे सजिव ज्या ग्रहावर राहतात त्याचा एक दिवस पृथ्वीच्या सुमारे ४३ दिवसांएवढा असण्याची चांगलीच शक्यता अाहे. तसंच त्यांचं एक वर्ष अापल्या २० वर्षांएवढा असावा.”
“अाणि ते का बरं?” जाधव कान देऊन ऐकत होते. 
“कारण, सिलिकॉनपासून कार्बनची प्रतिसृष्टी बनायची असेल तर तसं अावश्यक तापमान अाणि वातावरणाची अावश्यकता अाहे. ते तसं नसल्यामुळेच पृथ्वीवर एकाला जिवनदान मिळालं अाणि दुस-याची माती झाली” जाधवांचा गोंधळलेला चेहरा पाहून श्रीधरने पुढे विषद केलं होतं, “अहो, अापल्याकडची माती बहुतांशी सिलीका म्हणजेच सिलिकॉनची बनली अाहे.”
जाधवांनी समजल्याची पोच दिली.
“ पृथ्वीवरच्या २० वर्षांएवढं दिर्घ वर्ष याचाच अर्थ हा ग्रह त्याच्या सुर्यापासून पृथ्वीच्या तुलनेत बराच लांब अाहे. तेथील तापमान पृथ्वीवरील तापमानापेक्षा बरंच कमी असणार हे अोघाने अालंच. त्यामुळे हा एलियन पृथ्वीवर मुक्त संचार तर करू शकेल, पण फारच कष्टाने.” 
“म्हणजे अापण वाळवंटात फिरताना अापली अवस्था होईल तसंच काहीतरी.” जाधव होत असलेल्या माहितीच्या वर्षावाने दमून गेले होते. तरी तितकेच प्रश्नही त्यांना भेडसावत होते, “पण मला एक शंका अाहे…. तुम्हाला अांतरजालावरून जसं हे सगळं समजलं, तसंच मुंबईतला या लहरींचा स्रोत अचूक शोधणं शक्य नाही का?”
“नाही! एक तर या लहरी एखाद्या संगणकामुळे तयार झालेल्या नाहीत अाणि त्यामुळे त्या विशिष्ट पथावर (route) संक्रमित होत नाहीत. दुसरी गोष्ट, इतकी सखोल माहिती सार्वजनिक data मध्ये उपलब्ध नसते. ती इतर मार्गांनी मिळवणं बेकायदेशीर ठरेल.”
“मग अाता?”
“अाता अापण एकच करायचं. मुंबईत निर्माण होणा-या सगळ्या घन कच-याचं, केस, विष्ठा, मलमुत्र जे काही मिळेल त्याचं सिलिकॉन विश्लेषण करायचं. कार्बन dating करतात तसं काहीसं सिलिकॉन डेटींग.”
“बापरेऽ!”
“हो. काम तसं जोखमीचं अाहे. पण खरंच असा कोणी एलियन जर आसपास वास्तव करत असेल तर असं करणं फार गरजेचं अाहे. तेव्हा चला. कामाला लागूया!” जाधवांसाठी दार उघडत श्रीधर म्हणाला होता. 
जाधव जाताच श्रीधरने A.C. चं तापमान परत पूर्ववत केलं होतं, “हे जाधव वाळवंटातच जन्मले होते बहूतेक”.



“ती मुलद्रव्ये प्रयोगशाळेत पाठवली अाहेत. पण अाता पुढे काय?” जाधव दारातून अात येत येतच बोलले.
“आशा करूया की त्यांच्या विघटन क्षमतेची माहीती उपयोगी पडेल. अाणि…”
“अाणि त्यावरून ती कधी उत्सर्जित झाली होती ते कळू शकेल.”, श्रीधरला मध्येच तोडत जाधव म्हणाले, “म्हणजेच तो एलीयन त्याठिकाणी कधी होता ते कळू शकेल. अाणि मग तो अाता कुठे असेल याचा अंदाज घेता येईल!” जाधवांची न्यायवैद्यकीय (forensics) विभागात कसलेला अनुभव वाखाणण्या जोगाच होता.
“ते तितकसं सोपं नाही. त्या मुलद्रव्यांचं कार्बन ऐवजी सिलिकॉन अाधारीत chemistry लक्षात घेता, पृथ्वीवरचं त्यांचं विघटन फार क्लिष्ट प्रक्रिया ठरणार अाहे.”
इतरवेळी खरं तर श्रीधरला अाणखी बोलणं गरजेचं वाटलं नसतं, पण जाधव हा त्याच्या अाणि बाह्य जगातला एकमेव दुवा असल्याने त्यांना व्यवस्थित समजणं अत्यंत अावश्यक होतं. “माझ्या अंदाजाप्रमाणे“, श्रीधर संख्याशास्त्रातही निष्णात होता हे त्याच्या बेभरवशाच्या अचूकतेतून (non-confirming preciseness) अगदी कोणालाही लक्षात अालं असतं, “ तेथील जीवन सिलिकॉनचा पाया म्हणून वापर करत असल्याने, त्यांच्या विघटन गतिवरून त्या उत्सर्जनाची वेळ समजणं फार कठीण झालं नसतं, पण ते त्यांच्या ग्रहावर. इथे पृथ्वीवर विघटन करणारे सुक्ष्मजीव अापल्या जैवशृंखलेचा एक भाग अाहेत. त्या एलीअनच्या मलातून त्याच्या बरोबर अालेले त्याच्या शरीरातील काही सुक्ष्मजीव पडले असतील, तर अाणि तरच अापल्याला योग्य तो अंदाज बांधणं शक्य होईल. ज्याप्रमाणे अापल्या शरीरप्रक्रियांच्या सुरळीत कार्यप्रणालीसाठी काही किमान सुक्ष्मजीव अावश्यक असतात, त्याप्रमाणे ते त्यांना ही लागत असणार. अाणि तो अाजही जिवंत असेल तर त्याच्या विष्ठेत असे सुक्ष्मजीव मिळणं अगदी स्वाभाविक अाहे.”


जाधव श्रीधरच्या बुद्धीमत्तेने कधीही यापेक्षा कमी भारावून गेले नव्हते. जवळजवळ कधीही घराबाहेर न पडणारा, कोणाच्याही संपर्कात नसलेला हा माणूनघाणा प्राणी केवळ त्याच्या संगणकावर आकडेमोड करतो काय, अाणि त्याच्या अमर्यादीत बुद्धिमत्तेच्या जोरावर अशक्यप्राय वाटणा-या cases सोडवतो काय, जाधवांना सगळंच कल्पनातीत होतं. श्रीधरबद्दल जाधवांसारख्या मुरलेल्या पोलिसालाही फार माहीती नव्हती. त्यांच्यासाठी तो माणूस त्याच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी अचानक उद्भवला होता. जणू प्रकटच झाला होता. 


जाधवांना एका रात्री त्यांच्या एका मित्राचा फोन अाला होता. वरळी सी-लिंकवरती एक अज्ञात इसम जखमी अवस्थेत सापडला होता. डोक्याला भली मोठी जखम झाली होती. त्याच्या शारिरीक अांतर-प्रक्रियांची गती प्रमाणाबाहेर वाढली होती. श्वासोत्छ्वास बहूदा थांबलाच होता, पण डॉक्टरांच्या मते तो केवळ अनियमित झाला होता अाणि तो माणूस अजूनही जिवंत होता. बराच काळ डॉक्टरांचे सारे प्रयत्न अयश्वीच ठरत होते. अखेरीस जेव्हा खोलीचे तापमान दहा अंश सेल्सियसपर्यंत खाली अाणले, तेव्हा कुठे त्याची अवस्था स्थिरावली. पूढे शुद्धीवर अाला खरा, पण अगदी नव्या को-या स्मृतीसहीत. तो तिथे कसा अाला हेदेखील त्या बिचा-याला अाठवत नव्हते. दिड वर्षांहूनही अधिक काळ लोटला या घटनेला. ही अपघताती case शेवटपर्यंत काही solve झाली नाही, पण जाधवांच्या हाती मात्र एक हुकमी एक्का लागला. गेल्या दिड वर्षांच्या काळात त्या दोघांनी मिळून तब्बल बाविस cases तडीस नेल्या होत्या.


“असो. पण जाधव एक सांगा, हा साठा मिळाला कुठे?”
“कुठे मिळाला असेल असं वाटतं तुम्हाला?”
श्रीधरला फार डोकं खपवावं असं वाटलं नसावं. मग जाधवांनीच उकलभेद केला, “इथून फार लांब नाही. घाटकोपर sewage outlet च्या एक किलोमीटर अलिकडे एका manhole मध्ये सापडला.”
“यावरून अाम्ही त्या एलियनचं location मुंबईच्या सात sewage plan zones पैकी एकापुरती मर्यादीत करू शकलो अाहे.”
“मस्तच!”
“श्रीधरजी मजेची गोष्ट म्हणजे तुमचं घरही याच झोनमध्ये येतं अाहे! म्हणजे तुम्हीही एक suspect होता”, जाधव रांगडे हसत म्हणाले.
“हं. अाणि तुमचही जाधवसाहेब!… तेव्हा सांभाळून.”
“मस्करीचा भाग सोडा. पण श्रीधरजी, काम अजूनही जिकरीचं अाहे. कारण धारावीचं exhaust ही याच outlet ला येतं.”
“हं… पण तरीही, अापण खूपच मजल मारली म्हणायला हवं. अाता एक काम करा. घाटकोपर sewage क्षेत्रात प्रत्येक जोडणीला outlet च्या मुखाच्या विरुद्ध दिशेने monitor करायला लागू. मुखापासून सुरुवात केली तर जास्त लवकर कळेल अाणि कामही कमी करावं लागेल.”
“तशा सुचना अाधीच दिल्या अाहेत मी. पण अंदाजे किती वेळ लागेल असं वाटतं तुम्हाला?”
“४३! ४३ ही संख्या अापला परवलीचा शब्द अाहे. नक्की नाही सांगता येणार. कदाचित दिड महिन्यातच दुसरा साठा अशा एखाद्या कमी गर्दीच्या ठिकाणी गवसेल की लगेल सांगता येईल, किंवा कदाचित अाणखी बराच वेळ शोधत फिरावं लागेल.”
“तो एलियन अापली वाट पाहून निघून जायच्या अात अापण त्याच्यापर्यंत पोहोचलेलंच बरं”
“पोहोचायलाच हवं, जाधव. अाता इतक्याजवळ येऊन अपयश येता कामा नये अापल्याला. तो एलियन अाहे तिथेच थांबून राहीलाच पाहीजे.” एखादं कोडं सुटतानाची श्रीधरची अातुरता जाधवांना नविन नव्हती.
“ठिक अाहे तर, जाधव. मला कळवत राहा!” श्रीधर दाराकडे वळत म्हणाला.



दार लावतानाच श्रीधरच्या डोक्यात पुढच्या कार्यप्रणालीची अाखणी सुरू झाली होती. विचारात मग्न तो एका जागी स्तब्ध उभा राहीला. मनात विचार करतानाही हातवारे करण्याची त्याला सवय होती. इतक्यात एक भली मोठी जांभई अाली म्हणून त्याने समोर भिंतीवर टांगलेल्या घड्याळ्याकडे पाहीलं. रात्रीचे अाठ वाजले होते. सुर्य कधीच मावळला होता. श्रीधरने टेबलावर अस्ताव्यस्त पसरलेल्या कागदांवरून नजर फिरवली. अाज आणखी काम करण्याची त्याची इच्छा नव्हती. बाजूला पडलेल्या संगणकाच्या पटलावर एक संकेत झळकत होता. श्रीधरची गोळ्या घ्यायची वेळ झाली होती. 


अपघातानंतर अाजतागायत पूर्ववत झालं नव्हतं असं काही असेल तर ते म्हणजे हा, जीवघेणा निद्रानाश. डॉक्टरांनी sedatives लिहून दिल्या होत्या, त्यावर भागत होतं कसंबसं. श्रीधरने कपाटातल्या गोळ्या काढून हातावर घेतल्या त्या पुन्हा एक जांभई देत देतच.
“अाज पुन्हा त्या दिवसांपैकी एक दिसतो अाहे!” 
इतर रात्री गोळ्या घेऊनही बरेचदा नीटशी झोप येत नसे. पण मधूनच एखादे दिवशी प्रचंड झोप यायची. इतकी की काही वेळा अंथरूणात शिरायचाही धीर होत नसे. मग पुढचे काही दिवस अंग जडावलेलंच राहायचं. सुरुवातीला श्रीधरने लक्ष दिलं नाही. पण अाजची ही दहावी वेळ होती. श्रीधरला लक्षात होतं, कारण तिस-यांदा घडल्यापासूनच त्याने नोंदी ठेवायला सुरुवात केली होती. डोळे मेहनतीने विस्फारत त्याने संगणकाकडे धाव घेतली. गेल्या नऊ नोंदी अाता अनुमान काढण्यासाठी पुरेशा होत्या. लगोलग त्याने काही अाकडेमोड केली. संगणकाच्या पटलावर नाचणा-या संख्येने तो गार पडला होता….. ४३.३ ± ०.४ … पुर्णांकात ४३!


“म्हणजे? म्हणजे मी? म्हणजे मीच तो…?” श्रीधरभोवती त्याचं घर जणू घिरट्याच घालू लागलं होतं. त्याच्या डोळ्यासमोर नाचत होती, ती चौकट. त्याच्या घराची चौकट! त्याला बाहेरच्या जगापासून विलग करणारी, बंदीस्त करणारी चौकट!


We place a spherical cage in the desert. enter it and lock it from inside. We then perform an (geometrical) inversion with respect to the cage. Now, the lion is inside and we are outside the cage. 
- (Mathematical methods for) How to catch a lion 

No comments: