Monday, September 25, 2006

गुंत्यात गुंतलेला मी

संगणकाच्या लेखापटलावर मराठीतुन लेखन म्हणजे एखाद्याच्या इच्छाशक्तीने त्याच्याविरुद्ध मांडलेले अघोरी कारस्थानच असावे! आणि तरीदेखील मला हे साहस करण्याचे अहोभाग्य लाभावे, हे केवळ त्या मित्र-द्वयिंची थोरवी. त्यातील एक म्हणजे ज्याने बराहा नामक उपक्रम अस्तित्वात आणला आणि दूसरी, माझा जिवाभावाचा स्नेही अमित, ज्याने माझी या उपक्रमाशी ओळख करून दिली.

असो... तर आता हा सगळा गुंता कशासाठी?... प्रश्नात गुंता आहे खरा,... पण उत्तराला तो गुंत्यातून सोडविल याची काय खात्री? म्हणजे गुंतागुंतीचे प्रश्न विचारणे नेहमीच होत असते हो, पण गुंत्यातच प्रश्न निघावा, हि कदाचित पहिलीच वेळ असावी! आणि उत्तरात तरी तो नसावा, हि माफक अपेक्षा पुर्ण होईल याची जबाबदारी कोण घेतो?... मी तरी नाही बुवा!

हा केवळ एक गुंता आहे असे म्हणून पुढे-पुढे जायचे, आणि वाटेत सारखे शोधायचे, हे कसे वाटते?... मग तो गुंता कसला का असेना... असेल तो विचारांचा... किंवा भावनांचा... किंवा मग बंधनांचा... तुटलेल्या, विखुरलेल्या... कधीतरी जुळलेल्या... दूरवर पसरलेल्या, अथांग बुडालेल्या.... कुठेतरी चिंब भिजलेल्या... यत्कदाचित तुंबलेल्या ... तर कधीतरी मोकाट सुटलेल्या... कधीकाळी हरवलेल्या... तर कधी हरवून पुन्हा गवसलेल्या... किंवा असेल मग तो गुंता शब्दांचा... मनात ठेवलेल्या... ओठांवर फ़ुटलेल्या... डोळ्यांनी ऐकलेल्या... कानाने नकारलेल्या.... छातीवरच्या हाताने घेतलेल्या... दिलेल्या... देवून मोडलेल्या... मोडून विसरलेल्या... पण तरीही मनात गोठलेल्या...

हा उपक्रम अशाच असंख्य घटनांचा गुंतावळा आहे... हा गुंता सोडविण्यापेक्षा, त्यात गुंतण्यातच जास्ती मजा असते... आणि गुंतलो तरच तो सुटतो... कारण तेव्हाच तर तो उमगतो!... शेवटी, आयुष्य आयुष्य म्हणतात ते म्हणजे काही वेगळं का असतं.... अनंत आठवणींचा गुंताच की तो!