Monday, April 19, 2010

माझं काही खरं नाही...

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

मी डबा आणला नाही म्हणून ती आपला डबा तसाच परत घरी नेते, आणि मी मात्र तिच्या वेंधळेपणाच्या गोष्टी मित्रांत फुलवतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

कुत्रं अंगावर आलं म्हणून
मैत्रिणींच्या गर्दीतही ती फक्त मलाच बिलगते, आणि मी मात्र भोवतालच्या हशात मिसळत 'घाबरट' म्हणून तिलाच धपाटा देतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

तिने तोडलेल्या दाराचं हॅण्डल दुरुस्त केलं म्हणून ती अभिमानानं माझी पाठ थोपटते, आणि मी मात्र tv game मध्ये disturb केलं म्हणून तिच्यावरच खेकसतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

मी सांगावं म्हणून ती एकच गणित परत परत चुकवते, आणि मी मात्र S. L. Loney चा reference देवून मोकळा होतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

Chemistry च्या practical ला ती सारखी सारखी माझ्या opposite टेबलावरच्या मैत्रिणीपाशी घुटमळते, आणि मी मात्र confirmation test चे निकाल नाचवत lab बाहेर पळण्याचे plans रचत असतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

पहिल्या पावसात ओलेत्या अंगाची थरथर ती माझ्या स्पर्शाने पांगवते, आणि मी मात्र आकाशातल्याइंद्रधनुष्याचं physics समजावून सांगत राहतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

कानपूरला निघालेल्या पुष्पक express ला तीचे हिरमुसले हात पून्हापून्हा टाटा करतात, आणि मी मात्र एकएक स्टेशन मागे टाकत पुढील career ची स्वप्न रंगवण्यात मग्न असतो.

माझं काही खरं नाही... आणि प्रेमाचं तर त्याहून नाही

अचानक... ब-याच वर्षांनी मला तिची आठवण होते. google सर्च करत मी तिच्या college च्या फोनपर्यंत पोहोचतो आणि तिची ओळख काढत चौकशी करतो...

ती गेलेली असते... सोडून... पुढचा कुठलाही पत्ता न देता... कधीच परत न येण्यासाठी!

आणि मी मात्र श्वेताच्या मृत्युदुताला, त्या निर्जीव receiver ला हातात तसाच धरुन असतो.... सजीव दगडासारखा

माझं काही खरं...

वाचन व्या..दंगेखोर

-->
"अरेऽऽ प्रसंगी रस्त्यावरच्या दिव्याखाली वाचन करुन दिवस काढले आहेत!", असं म्हणणा-या भल्याभल्या वाचनप्रेमींना फेंफरं आणतील असे व्यासंगी मुंबईच्या रेल्वे गाड्यांतून सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळांत प्रवास करताना भेटतात. एकाचा डावा खांदा दुस-याच्या उजव्या काखेत हरवेपर्यंत खच्चून भरलेल्या गर्दीत आणि आत येताना आपल्या मुख्य शरीराबरोबर आणलेले accessary अवयव अजूनही जवळपासच असतील आणि योग्यवेळी ते आपल्याबरोबरच बाहेर पडतीलच याची कुठलीही खात्री नसतानादेखील एखादा बहाद्दर हातात अठ्ठ्यात्तर ठिकाणी दुमडलेलं वर्तमानपत्र चाळण्यात मग्न असतो. त्याच्या आजुबाजूचे तिन-चार जण मग मिळेल त्या angle ने आणि लाभेल तेवढा perspective वापरत स्वतःची वाचन-तृष्णा शमविण्याचे सगळे प्रयत्न पणाला लावताना दिसतात.
स्वाभाविकपणे, तो म्होरक्या त्याच्या आवडी-निवडीला प्रामाणिक राहून स्वतःच्या वाचनवेगानुसार पानं उलट-पालट करत राहतो आणि त्याचे इतर आगंतुक वाचक-स्नेही आधीच्या अर्धवट वाचलेल्या मथळ्यातून पुढच्या मथळ्यात प्रवेश करत राहतात. सामान्यतः या बदलाला adjust/adopt होण्याची निसर्गदत्त क्षमता प्रत्येकातच असते. पण या उत्क्रांत-मेंदुच्या मोबदल्यात आपण किती मोठ्या मनोरंजनाला मुकलो आहोत हे पडताळण्यासाठी केलेला हा प्रयोग:
स्थळ: लोणावळा-पूणे लोकल
वृत्तपत्र: लोकमत, दिनांक १७ एप्रिल २०१० ची पूणे आवृत्ती
(सुसंगतीसाठी पान-बदलाचे संकेत दोन सलग स्वल्पविरामांनी ,, आयोजिले आहे, तरी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा.)
"माझ्यावरील आरोप बिनबुडाचे" - शशी थरुर
परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरुर यांच्या राजिनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी गोंधळ घातल्याने लोकसभा राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करावे लागले. आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना थरुर यांनी केलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे, " माझ्यावरील आरोप बिनबूडाचे आहेत,, मी पाकिस्तानची बहू नक्कीच नाही. मी केवळ शोएबची बीवी आहे. मी पाकिस्तानशी विवाह केलेला नाही; तर एका पुरुषाशी निकाह केलेला आहे. काही लोक या निकाहाला राजकिय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना ते करु द्या".

मदरशात कुराण, बायबल, वेदाचे धडे
उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद जिल्ह्यातील संगम नगरीच्या करेली भागात एका मदरशात कुराण, बायबल आणि वेदाचे धडे सोबतच दिले जातात. इस्लामिक एज्युकेशन अँड रिसर्च ऑर्गनायझेशनच्या अखत्यारीत सुरु असलेल्या या मदरशाचा,, शोध घेण्यासाठी इस्रोच्या वरिष्ठ संशोधकांची उद्या थिरुवअनंतपूरम् येथे बैठक होत आहे. बैठकित या मोहिमेच्या अपयशाची कारणे शोधली जाणार आहेत

समाजाभिमुख गुलाबमामा
चाकणजवळील राणूबाई मळ्यातील मतदारसंघातून सतत २५ वर्षे निवडून येणारे गुलाबमामा लेंढघर सर्व परिचित आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची ३१ वर्षे साजरी करताना अनावश्यक खर्च टाळून त्या रकमेतून ३१ आदिवासी कुटुंबांना चादरी, त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके वाटप केले. ते नेहमी म्हणतात,, "भारत-पाक संबंध सुधारण्याच्या शक्यतेतूनच भुत्तोंची हत्या झाली आहे!".
(मधल्या काही वेळात नाटक-सिनेमे यांच्या जाहिराती, वधु-वर सुचकता अाणि सरकारी टेंडर्सनी भरलेली पाने वाचून वाचल्यासारखी फडफडतात... पण, त्यातूनही head-liners मात्र सुटत नाहीत.)

महाराष्ट्र संपादक परिषदेच्या कार्याचा छगन भुजबळ यांच्याकडून गौरव,, जेथे 'धन' तेथेच 'फन'

दुल्हेराजा आँफर! लग्न करताय? डोकं लढवा,, होमियोपॅथी वापरा, केस गळती थांबवा.

शहरात साखरेचा भाव तीस रुपये किलो...,, अनोळखी महिला ठार, ओळख पटविणा-यास,, जागा देणे आहे

सुरक्षित शहरे?
काही दिवसांपुर्वीपासून हिंजवडी, पिंपळेगुरव, मुंबई याठिकाणी विवाहितेवर, तरुणींवर बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत,, यावरुन शिक्षणक्षेत्रात चंगळवादाची परिसीमा गाठल्याचे दिसले. ही कृती अतिशय घृणास्पद आहे,, हा थकवा दूर करण्यासाठी विश्रांतीची गरज असते. किंबहूना शिक्षकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुट्टी आवश्यकच आहे. मे महिन्याच्या सुटीच्या काळात त्यांच्यावर निवडणूका, जनगणना किंवा अन्य कोणतीही अशैक्षणिक कामे लादू नयेत.

घरोघरी कचरा गोळा करणा-यांना पुणे महापालिकाच देणार,, कांदा-कोबीची पचडी
साहित्य: बारीक चोचवलेला कांदा, चिरलेला पांढरा कांदा, पाव वाटी ओला मटार, अर्धी वाटी ओले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, लिंबाचा रस, फोडणीसाठी तेल
कृती: ...

Saturday, April 10, 2010

नशीब, दुसरं काय?

कधी विचार केला अाहे, असं (नाही, असंच) का होतं याबद्दल?


गृहपाठ केलेला नसेल तेव्हाच इतिहासाचे "अौरंगजेब" मास्तर वह्या तपासायला का मागतात? option ला टाकलेली गणितंच नेमकी परिक्षेत का येतात? अाणि जीवाच्या अाकांताने सर्व syllabus पूर्ण करून जय्यत तयारीनिशी सोडवलेला पेपरच नेमका कसा काय फुटतो? cutter नसतानाच पेन्सिलीचं टोक कसं बरं तुटतं? ते अख्ख्या वर्गात नेमकं परवाच भांडण झालेल्या मित्राकडेच का असतं? अभ्यासात हुष्षार अाणि घरकामात नीटनेटकी मैत्रिण सगळ जग पालथं घालून शेवटी अापल्याच शेजारच्या building मध्ये का रहायला येते? येते तर येऊ द्यात, पण नेमकी तिचीच अाई माझ्या अाईच्याच भिशी-मंडळात का दाखल होते? इतर वेळी दारात उभ्या राहूनसुद्धा फक्त वरच्या कुळकर्णी अाणि पलिकडच्या देशपांडे एवढ्यावरच गप्पा मारणा-या अाया, मग अशा casual पार्टीजमध्ये "मुलांची शैक्षणिक घोडदौड" यासारख्या माझ्या शिक्षकालाही न समजलेल्या गहन विषयावर का चर्चा करतात?


मी छत्री विसरलो तरच पाऊस का येतो? अाणि पाऊस नाहीच अाला, तर मी बसमध्ये बसलेल्या दिशेलाच सूर्यदेव हजेरी कशी काय लावतो? मी उभा असलेली रांगच नेहमी सगळ्यात हळू का बरं पुढे सरकते? कंटाळून तिकिट काढलेलं नसतानाच, इतर वेळी ढुंकुनही न बघणारा t.c. माझं अागत्यानं स्वागत का बरं करतो? प्रवासात माझ्याशेजारी नेहमी अाजीच कशा काय बसतात? अगदी लांबपल्ल्याच्या प्रवासातसुद्धा नेमकी मी बसलेली bogie bachelors' special किंवा mens only कोण घोषित करतं?


जगातल्या सगळ्या सुंदर मुली नेहमी अनोळखीच का असतात? त्यांची अोळख करुन देवू शकणारे सगळेच rational thinker का असतात? त्यांच्या मते ती "तश्या" टाईपची मुलगी का नसते? असं असूनही मग वर्गातल्या सर्वात सुंदर अशा "ती"ची, एखाद-दुसरी तुकडीच काय, पण अगदी तिन-चार मजले किंवा तितक्याच इयत्ता पार करून शेवटी सामान्यातिसामान्य अशा "त्या"च्याशी कोण अोळख करून देते? इतर वेळी फक्त तिन हात सोडून बसलेल्या, जगातल्या एकमेवाद्वितीय smart माझ्याकडे कधी एक साधा कटाक्षही टाकण्याची तसदी न घेणा-या तिला, मी जगापासून विरक्त होऊन अाणि जगाच्या अागंतुकतेच्या सगळ्या शक्यता चूकवत तिच्याच ध्यानसाधनेत मग्न असतानाच नेमकी माझ्यावर नजर टाकण्याची गरज का भासते? अाणि तशातच इतर वेळी दिड फुटावर धरलेल्या माझ्या पेपरातील वजाबाकीचं चिन्ह चष्मा लाऊनही न दिसणा-या गणिताच्या बाईंना सत्तावन्न बाकं दूरवर चाललेला अामच्यातला परस्पर-व्यवहार कसा काय अचूक दिसतो?


मी गबाळ्यासारखा रमत-गमत फिरतानाच ती रस्त्यात अाडवी का येते? इतर वेळी माग काढूनसुद्धा न सापडणा-या तिच्या पत्त्यावर नेमका अाईने दिलेली कापडी झोळी खांद्याला लटकवून डागाळलेल्या अर्धचड्डीवर अाणि bathroom चप्पल पायात असतानाच मी कसा काय जाऊन थडकतो? दुस-या खेपेला मस्त डागडूजी करून गेल्यावर मात्र ती का बरं घरात नसते? नवीन कपडे घालून जात असतानाच नेमका चिखल कसा काय उडतो? अाणि त्या रिक्षावाल्याला एक सणसणीत शिवी घालत असतानाच तीची अाई कशी काय बाल्कनीत येते?


श्रीमंत वडील, प्रेमळ अाई, समजूतदार बहिणी अाणि सुंदर बायको ह्या नेहमी मित्रांच्याच घरी का बरं सापडतात? कितीही प्रेमळ निघाली तरी नेमके अापल्याला अावडणारे पदार्थ खाण्यावरच अाईचा मज्जाव का बरं असतो? प्रसंगी 'या कानाचं त्या कानाला कळणार नाही' इतक्या सराईतपणे लाडू पळवता येणा-या माझ्या हातून डब्याचं झाकण नेमकं अाई झोपलेली असतानाच कसं काय निसटतं? पडलं तर पडलं, पण अाईची झोप मोडली नसताना, अगदी अलगत ते झाकण उचलायच्या प्रयत्नात ते परत परत पडून अावाज का बरं होतो? अाईची झोप मोडलीच नाही असं का होत नाही?


कितीही विश्वास ठेवायचा नाही ठरवलं तरी नेहमी 'सांगितलेलं भविष्य खरं ठरलेली' माणसंच मला कशी काय भेटतात? नवसाला फळ न अालेले भक्त कधीच का भेटत नाहीत? मला पोहोचायला उशिर होत असेल तेव्हाच नाटक कसं काय वेळेवर सुरु झालेलं असतं? त्यातूनही इतर वेळी सूम्म असलेला माझा फोन नेमका नाटक सुरु असतानाच कसा काय मॅडसारखा अोरडू लागतो?


का?... असच का?....

नशीब! दुसरं काय!!... बरोबर? अजिबात नाही. म्हणजे माझ्यामते तरी नाहीच! सांख्यिकी (statistics) च्या भाषेत बोलायचं झालं तर biased sampling चा इफेक्ट. पेन्सिलीचं टोक तुटण्यापासून ते ज्योतिषशास्त्राच्या यशापर्यंत, अगदी तेच! कसं ते तुम्ही शोधा. पण मी एवढंच सांगेन की, अापण काही अाठवणी किंवा गोष्टी खूप जास्त जपून ठेवतो, तर काही अापल्या लक्षातही येत नाहीत. अाणि इतर वेळी अापली "यश मिळेपर्यंत न थांबण्याची" चिकाटी कारणीभूत ठरते.


काही दिवसांपूर्वी माझी एक शाळेतली वर्गमैत्रिण भेटली होती. ती सांगत होती, "तिन मजले पार करणा-या तिला, तिन हातावरचा बाकडा अोलांडणं मात्र फार फार कठीण गेलं होतं".