Thursday, October 12, 2006

(वि)चित्रवारी

काही दिवसांपूर्वी अमोल पालेकर दिग्दर्शित थांग पाहाण्याचा योग आला. प्रभात चित्र मंडळ यांच्यातर्फे ठाण्याच्या eternity mall मध्ये या खास अंकाचे आयोजन करण्यात आले होते. पहिले चित्रपट आणि नंतर अमोल पालेकर, विजया मेहता, ऋषी देशपांडे, संध्या गोखले आदी चित्रपटाशी निगडीत मान्यवरांशी चर्चा असा तो एकूण कार्यक्रम होता.

सहाजिकच अशा या मराठमोळ्या कर्यक्रमाला उपस्थितीही तशीच मराठी बाण्याची असते हे वेगळं सांगायला नको. नेहमीप्रमाणे, एखाद्या मध्यमवर्गीय समाजाला शोभेल असे, आम्ही वेळेआधी पुरते अर्धा तास हजर झालेलो असतो. ( त्यात वेळेचं महत्त्व किती आणि दिलेल्या पासेसवर आसनक्रमांक नसल्याने योग्य जागा मिळविण्याची middle-class धडपड किती, हा मुद्दा तितकासा महत्त्वाचा नसतो... आणि तसे असले तरी, यात आमचा गुन्हा असा काहीच नसतो. कारण, बाकी सर्व जग जरी बदललं, तरी मराठी माणूस त्याच्या मध्यमवर्गीय गुणांना जागतो, हा निसर्गनियमच आहे. ) तसं उशीर होण्यासाठी आमच्यात स्त्रिलिंगी जोडव्यक्ति कोणीच नसते हेही कारण महत्त्वाचं! (कदाचित हाही एक मध्यमवर्गीय नियम ठरावा) आणि असं असुन सुद्धा बेलाला पाने तिनच या उक्तिप्रमाणे, तिथे पोहोचणारे आम्ही बहुदा शेवटचेच असतो.

ठरल्यावेळेपेक्षा चित्रपट फक्त अर्धा तास उशिरा सुरु होणार असतो. आणि त्यामुळे चित्रपटाआधीच्या काही घटिका आम्हाला अशा चहुकडून उधार मिळलेल्या क्षणांवर उजळाव्या लागतात. आम्ही आसनावर बसल्याबसल्या औत्सुक्यसुलभ हालचाली सुरु ठेवतो आणि आजुबाजुला व्यक्तिस्वातंत्र्याचे नवनवीन अविष्कार उलगडत जातात.

" गुजरते वहिनी, तुम्ही इकडे बसा"
"हे तुझं नेहेमीचंच आहे..."
" हि खुर्चीपण तुम्हीच घेतलीत... कमालच आहे!"
" अहो जरा खाली सरका ना, समोरचं दिसत नाही"
"अरे! काय म्हणता... आणि, परवा ब्रा. सं. च्या बैठकीला आला नाहीत... वसन्तराव काय झकास बोलले म्हणून सांगू "
" माझ्यासाठी एक popcorn "
"श्शी:!... गरज असेल तेव्हा याचा फोन कधी लागलाय?.... फेकून दे म्हणावं त्याला!"
"तरी घरातून निघताना दहावेळा विचारलं होत... आता बस तसाच, पिक्चर संपेपर्यंत!"
" अहो जरा A/C कमी करता येईल का?"
"यावेळी तरी mic ची व्यवस्था करा म्हणावं.... मागच्यावेळी काही ऐकुच येत नव्हतं.... "
"छे हो! ती कसली येतेयं.... तीला असले कौटुंबिक सिनेमे आवडत नाहीत"
"येताना दुध तापवत ठेवलं होतं... गॅस बंद केला होता का हो तुम्ही? "
"लास्ट रो... थर्ड चेअर..."
"एक्सक्युज मी.... "
"काय हो? ही परांजप्यांची चारु ना?....."
"अरे तू एक सीट तिकडे सरक, रेणुका तिथे बसेल... आणि विजयराव तुम्ही पलिकडे !"

अशा अनोळखी, पण तरीही अंगवळणी पडलेल्या कल्लोळात पहिली पंधरा-एक मिनिटे सहज सरतात. पुढची काही पडद्यावर सरकणाऱ्या जाहिरातींमध्ये जातात. अशा जाहिराती मध्यमवर्गीय माणसाने लक्ष देऊन पाहाव्यात जरूर, पण लक्षात मात्र ठेऊ नयेत. कारण, ज्याच्या जीवनाचा सारा ओलावा, त्या हमामच्या दोन वड्यांबरोबर फुकट मिळणाऱ्या तिसऱ्या वडीपुरता कसाबसा टिकतो, त्याला एका मर्सिडिज-बेन्झ बरोबर मिळणारा डबल-डोअर फ़्रिज काय झेपणार, कपाळ?

मधेच कुठेतरी आपल्या मुलाबरोबर खिशातले पैसे आणि चित्रपटाभोवतीचे मध्यांतर यांचे गणित सोडवणारे वडिल दिसतात, तर कुठेतरी कडेवरच्या रडणाऱ्या बाळापेक्षा आजुबाजुकडुन होणाऱ्या कुत्सित कटाक्षांनी कावरीबावरी झालेली आई नजरेत भरते. बाकी ठाणा-डोंबिवलीच्या मासळीबाजारातसुद्धा साखरझोपेत पेंगणारे गुटगुटीत बालक, मॉलच्या निरवं थंडाईत घुसल्याघुसल्या कसे काय जागे होते, हा एक यक्षप्रश्नच आहे.

तर अशा या असंख्य लाटांवरती हा (वि)चित्रानुभव हिंदोळत पुढे सरकतो आणि येणाऱ्या प्रत्येक लाटेबरोबर नावेत उडणारे ते आठवणींचे चार-चार शिंतोडे आम्ही सहज टिपत राहतो. मग हळुच केव्हातरी पडद्याबाजुचं दार उघडतं, त्या दारातून व्यवस्थापक नावाचे कुणीतरी आत शिरते, झालेल्या उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त करते, आणि चित्रपट सुरु होत असल्याची घोषणा करुन जाते. पण कमळाच्या पानांवरले मोती टिपणाऱ्या आम्हाला चिखलात पाय बुडल्याची तमा नसते.

पुढे मग पटलावरील चित्र धावू लागते, आणि इतकावेळ गोंगाटात भारंभार नटलेला जिवंतपणा मालवलेल्या दिव्यांबरोबर अंधारात विरून जातो. मग प्रत्येकजण वेगळा असतो.... ज्याचा-त्याचा असतो... पडद्यावरच्या निर्गुण सावल्या त्याला हळुहळु आपल्याशा वाटू लागतात आणि त्याचवेळी शेजारी बसलेला त्याचा सगुण सोबतीमात्र त्याला परका झालेला असतो.

Friday, October 06, 2006

सुमित्रा

लहानपणी म्हणे माझे लग्न ठरले होते. नाही नाही! हा काही बालविवाहाचा एखादा प्रसंग नाही.... तर ती माझी एक कल्पना होती... म्हणजे मला कोणीही मस्करीत काही विचारले, की माझे उत्तर तयार... आणि, माझ्या बायकोचे नाव "सुमित्रा" होते. आता हि कोण कुठली सुमित्रा, हे कदाचित त्या विश्वकर्म्यालाही ठाऊक नसावे बहुदा. एवढे मात्र नक्की, कि अशा नावाची व्यक्ति आमच्या सोसायटीतच काय पण माझ्या आठवणींच्या पंचक्रोशीतही दुरदुरपर्यंत कोणी नव्हती. बरे, हे काही माझ्या बायकोचे लग्नानंतरचे नाव होते, अशातलाही प्रकार तो नसावा, कारण जेथपर्यंत मला आठवते, हि सुमित्रा कुठेतरी आटपाट नगरीत मझ्यासाठी वसत असावी अशीच माझी भूमिका होती. तर थोडक्यात काय, SRK च्या एखाद्या चित्रपटाला शोभून उरावा असा तो एकूण घाट होता. ( म्हणजे माझा तत्कालिन बोबडेपणा (त...त...तोतरेपणा) अद्यकालिन SRK touch किती देऊ शकला असता हि बाब गौण मानण्याचा मोठेपणा दाखवू शकलात तरच!)

असो... तर ही सुमित्रा मला अजूनपर्यंत काही भेटलेली नाही. आणि आता चुकून-माकून समोर आलीच, तर तिचे स्वागतागत्यादी सोपस्कार पार पडतील अशी माझ्या मनाची तयारीही वाटत नाही. कारण, आजघडीला सुमित्रा नाव असलेली षोडशकन्या म्हणजे, पहाटे लवकर उठणारी, थोरामोठ्यांचा शुभाशिर्वाद आणि देवादिकांची षोडशोपचारे पूजाअर्चा घडल्याविना घोटभर पाणीही न पिणारी, डोक्यावर किमान अर्धा लिटर तेलाची उदकशांत घालून तो केशसंभार करकचून पिळून घेणारी, घरापासून कॉलेजात जाईपर्यंत नाकाचा मार्गिकेशी असलेला कोन जराही बदलू न देणारी आणि चुकून जर कोणी ओळख देण्याचे अवलक्षण घडवलेच, तर तेवढ्याच तिऱ्हाईतपणे चेहऱ्यावरच्या मुद्रीत हास्य नामक कोळिष्टकाने परतवणारी, किंवा त्याच्याही पुढे जावून एखाद्यच्या good morning वाचक अवमानाला "सुप्रभात" असा घरचा आहेर देत टोलवणारी, सकलगुणसंपन्न धर्माचारिणी एकमेवाद्वितीयाच माझ्या डोळ्यासमोर येते.

मग अशी ही सुमित्रा रोज वेळेवर कॉलेजात जाते. तिथे सामान्यतः एखाद्या कोपऱ्यात सापडणाऱ्या कट्टा नामक कर्मभुमी असलेल्या, आकाश हेच पांघरुण आणि धरणी म्हणजे पायघडी समजणाऱ्या आणि या दोहोंच्या मध्ये त्या विश्वेश्वराने निर्माण केलेल्या तितक्याच मौल्यवान विषमलिंगी विश्वचा आस्वाद डोळे भरभरुन लुटणाऱ्या, "मवाली" हि उपाधि degree म्हणून धारण केलेल्या शैक्षणिकदृष्ट्या निरुपद्रवी विद्यार्थिसमुहाला जातायेता शिव्यांचा रतीब घालते. आणि तिच्या भक्तांपैकी एखादा चुकून त्यांच्यापासून दहाएक मैलांच्या परिघातही आढळल्यास पुढील दोनएक तास "आपण कशासाठी कॉलेजात येतो, आपले आईवडिल आपल्याला इथे का पाठवतात, त्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात, प्रसंगी स्वतःच्या इच्छाआकांक्षांना कसे गालबोट लाववे लागते... वगैरे वगैरे" उपदेशाचे चार शब्द ऐकवते. या कर्यक्रमाच्या शेवटी "यापुढे असे झाल्यास" कोणत्या परिणामांना सामोरे जावे लगेल याची उजळणी करायलाही विसरत नाही.

या सुमित्रेला दर परिक्षेत न चुकता "पैकीच्यापैकी" मार्क कसे मिळतात, हिच्याकडेच प्राध्यापकाने अगदी आडवळणाला जाऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा तितक्याच सहजपणे कशी सापडतात, तीला भाषेसारख्या अवजड-बोजड विषयांत रुची कुठून आणि कशी निर्माण होते आणि आमच्यासारख्या पामरांच्या प्रकृतिला वर्ज्य असलेले अलंकारिक शब्द हिच्या निबंधात "पैशाला पन्नास" मिळत असल्यासारखे कसे काय मुक्तापणे विहरत असतात, वक्तृत्व स्पर्धेत हिचे भाषण सुरु होण्यापूर्वीच हिचा पहिल्या क्रमांकाचे परितोषिक कसे काय मिळते आणि याच महात्म्याच्या अवतीभवती वसलेल्या इतरेजनात मात्र या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची कुवतही परमेश्वराने पदरी पडू देऊ नये या विरोधाभासाचेच जास्ती आश्चर्य वाटते.

तर अशी ही सुमित्रा म्हणजे माझ्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने पहिलेवहीले आणि शेवटुन दुसरे एकपात्री प्रेमप्रकरण आसावे. अशा सुतासारख्या सरळसोट प्रकरणाच्या बाबतीत "पुढे काय झाले" यापेक्षा "पुढे काही झाले का" हाच प्रश्न जास्ती संयुक्तिक ठरतो. आणि अशा व्यक्तिच्या प्रेमात पडलेल्यांना "इतक्या सोप्या तलमी अयुष्यात" क्षणिक का होईना पण गुंता निर्माण केल्याचा अभिमान मिरविण्याचा आनंद लुटता येतो. "सुमित्रा" नामक ही एक गुंतवळ तुम्हा स्नेह्यांपुढे झटकताना मलाही अगदी तसाच आनंद होतो आहे.

असो... सुमित्रेला आज ओळख न दाखवण्यामागे आणखीही एक (आणि कदाचित अधिक महत्वाचे) कारण आहे. पण तो खुलासा नंतर कधीतरी. एवढे मात्र नक्की, की आज सुमित्राच काय पण खुद्द ऐश्वर्यालही ओळख द्यावी या मनस्थितीत मी नाही.