Saturday, May 22, 2010

संसर्ग

विज्ञानाच्या किंवा डॉक्टरकीच्या कुठल्याही पुस्तकात उल्लेखही नसलेल्या काही तात्कालिक संसर्गजन्य साथींचा ऊहापोह!

गिरगावातल्या आपल्या चाळीचा दुसरा मजला पायावेगळा करत तो त्याच्या खोलीकडे झेपावतो आणि त्याच्या चेह-यावर संदिग्ध भावनांचं जाळं पसरूलागतं. एरवी चाळीच्या घरांना दरावाज्याची पाचपोच असतेच कुठे म्हणा. पण आजचा प्रसंग कहीतरी वेगळेच संकेत देत असतो. दाराभोवती जमलेल्याघोळक्यातून वाट काढत तो आत येतो. समोरच्या बाजेवर नानूआजी त्याच्या बायकोला धीर देत म्हणत असतात, " मन घट्ट कर, सरस्वती! असे प्रसंगयायचेच". त्याची बायकोही एखाद्या संगित-मैफिलीतल्या पायिक श्रोत्याप्रमाणे मुसमुसुन दाद देते. त्याच्या शीरेवरचे ताण क्षणाक्षणाला अधिकाधिकतिक्ष्ण होत जातात. एवढ्यातच, शेजारचे देसाई त्याच्या खांद्यावर थोपटतात, " कपाटाचं कळलं... वाईट झालं".
"हं...", अभावितपणे उत्तरलेल्या त्याला हळूहळू सगळा प्रकार लक्षात येऊ लागतो आणि त्याला 'तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडणे' की तसच काहीसं होऊ लागतं. तो जवळजवळ खेकसतोच,
"ओ नानूआजी... चला! काही झालं नाहीये" ...."आणि काय गं? तू कशाला भोकाड पसरलं आहेस?".
"अहो भोकाड कुठे, पण हे सगळे इतकं दु:ख करायला लागले, मग मलाही रडू आलं"

आता एका साध्या कपाटावरही कुटुंबतल्या सदस्यागणिक प्रेम करणा-या संस्कृतीविषेशाला सादर गृहीत धरलं, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे, रडणं हा बायकांचा संसर्गजन्य रोग आहे.

sisterly relation वर एक समर्पक कथा ऐकल्याचे आठवते: एकदा सीता-गीता जोडगोळीला रडताना पाहून झंप्याने सीतेला विचारले, "का गं बाई, का रडतेस?". त्यावर सीता उत्तरली, "मला नक्की नाही माहिती, पण ही रडते, म्हणून मी रडते". त्यांच्यातील भगिनीप्रेमाने गहिवरलेल्या झंप्याने मग गीतेला कारण विचारलं. "मी?... मी कुठं रडते आहे. मघापासून काहितरी डोळ्यात खुपतं आहे झालं. तर मला मदत करायची सोडून ही बया माझी नक्कल करून चिडवते आहे", गीता त्रासिक आवाजात खेकसली. यावेळी झंप्याच्या चेह-यावर बद्धकोष्ट झालेल्या भस्म्यासारखे भाव न उमटतील तरच नवल! आता हा सीतेचा मोठेपणा आणि गीतेचा कोतेपणा असा सरळ सोपा अर्थ लावण्याची घाई कराल, तर पूढच्या वेळेस सीतेची गीता आणि गीतेची सीता झालेली दिसेल. एकाच वेळी हे असं परस्पर-व्यस्त पण तंतोतंत पूरक वागणं फक्त दोन बहिणींनाच जमू शकतं, म्हणून हे नातं विलक्षण मोलाचं. तिथे तिसरा नेहमी ति-हाईतच असतो. असो! महत्वाचं काय तर रडण्याचा संसर्ग!

अरे, समोरच्याने दिली म्हणून आपल्याला यायला 'रडणं' म्हणजे काय जांभई आहे का? पण 'जांभई परवडली' म्हणायला लावणारे 'रुंदन'-संसर्गाचे विक्रम हा - हा म्हणता Indian Idol किंवा 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'च्या elimination round मध्ये सर्रास दिवसामाजी मोडीत निघतात.

रडणं हा बायकांचा संसर्गजन्य रोग आहे. पण याचा अर्थ पुरुष सोवऴ्यातलं जीवन जगतात असं मुळीच नाही. पुरुषांकडे बायकांएवढी consistency नसते एवढंच. नाही तर 'टॉक टॉक' करीत चौथ्या माळ्यापर्यंत आपल्या आगमनाची बातमी पोहोचवणारे खबरी किंवा सहनशीलता, प्रतिकारशक्ती सारख्या तद्धन डॉक्टरी गैरसमजांना लिलया धुडकावणारे ' six-pacs' चे उपासक, वगैरेंसारखे अल्पकालीन संसर्ग-विटाळ बरेच सांगता येतील. पण एकूण काय, तर संसर्गाच्या बाबतीतही निष्ठेचं वाण पुन्हा बाईच्याच पदरी. पुरूषाची झोळी इथेही रीकामीच!

हं, आता जसे कही संसर्ग लिंग-विशिष्ठ असतात, तसे काही लिंग, वचन यांच्या मर्यादा भेदून पसरलेले दिसतात. उदाहरणार्थ, प्रेमात पडणं! अगदी काल-परवापर्यंत एकावेळी एकट्या-दुकट्या (फार फार तर द्विभुज 'त्रिकोणी' संबंधा) पुरता मर्यादीत असलेला हा वैयक्तिक खेळ आजकाल सर्रास सांघिक पातळीवर खेळला जातो. एकाच रूपगर्वितेच्या अदांपुढे हळहळताना, विव्हळताना दिसणा-या वर्गाचं (किंवा काही वेळेस अख्ख्या संस्थेचंच) किंवा मग एकाच वेळी आजुबाजूला असलेल्या प्रत्येक मुलीच्या साधनेत रममाण झालेल्या साधकाचं दर्शन होणं आता तितकसं दुर्मिळ राहीलेलं नाही. बरं, हे झालं या रोगाच्या 'वचन'-व्यापकतेबाबत. याच्या 'लिंग' विलासी गुणांबद्दल सामाजिक पातळीवर मतं उधळणं हा पूरोगामी वृत्तीचे द्योतक मानण्याचा संकेत आहे. त्यामुळे या मुख्यत्त्वे करून वैचारीक-संसर्गातून जन्माला आलेल्या आणि कालौघात तथाकथित बुद्धीवादींच्या अथक्-परिश्रमातून कोकणस्थ ब्राह्मणांच्या आमटी वरताण पाणीदार बनलेल्या विषयावर आता अधिक बोलणे 'नळ' गे (की नलगे?, नल गे??, न लगे???... की असंच कहीतरी)!
असो! तर प्रेमात पडणे हा सद्याचा hot संसर्ग आहे.... पण त्याविषयी आणखी बोलणे नको. कारण असं म्हणतात, की हा रोग बोलण्यातून फैलावतो, हसण्यातून रुजतो आणि सुरुवातीला जरी साथीने पसरत असला, तरी एकदा जडल्यावर मात्र दुराव्यातून आणखीनच बळावतो. त्याहीपेक्षा, गंमत म्हणजे पु. ल. देशपंडे यांच्या " जल - शृंखला" योगानुसार या रोगाची लक्षणं डॉक्टरला सोडून इतर सगळ्यांना अगदी सहज जाणवतात!

अशा या संसर्गजन्य रोगराईतच आजपर्यंत 'शिक्षण' नामक उद्योगवृक्ष आपली पाळंमूळं घट्ट रोवून वधारत आला आहे. एकामागोमाग एक असे 'engineering', 'medicine', 'C.A.', 'M.B.A.' नावाचे एकापेक्षा एक बलवत्तर साथीचे रोग पसरतात आणि नुकतेच वयात आलेले कोवळे जीव पटापट् बळीपडत जातात. या रोगाचं वैशिष्ट्य म्हणजे या रोगाची लागण न झालेल्या अथवा यातून सुटका झालेल्यांना रुग्ण असे संबोधिण्याची प्रथा आहे. चांगली गोष्ट अशी, की अशा रुग्णांसाठी सरकारी अनुदानातून प्रथितयश संस्थांमध्ये उपचार उपलब्ध आहेत. TIFR, IISc, HRI, TISS, IGIDR ही यापैकीच काहीसंस्थांची नावं. साधारणत: ४-५ वर्षांच्या उपचारानंतर हे रुग्ण बरे होवून घरी जावू शकतात. पण या उपचारालाही दाद देणा-यांची मात्र मग बाहेर MIT, Harvard नामक US-based संस्थामध्ये रवानगी करावी लागते. असाध्य गोष्टी साध्य करण्याची किमया US ला गेल्याशिवाय घडत नाही हासुद्धा एक कालपरत्त्वे बळावलेला सांसर्गीक समज आहे, हे तुर्तास दुर्लक्षितच ठेवू.
हं... सध्या मला blog लिहिण्याच्या एका नवीन संसर्गाने पछाडलं आहे म्हणतात. म्हणजे हल्ली मी मनातल्यामनात की कसं ते विचार न करता, ब्लॉगातल्या ब्लॉगात करतो. विशेष म्हणजे या रोगाचं निदान फक्त act-n-response प्रक्रियेनेच होते. म्हणजे, थोडक्यात सांगायचे तर या रोगावर लस शोधण-या डॉक्टरला स्वत: ब्लॉगलिहिण्याचं ' जंतुकीकरण' टोचून घ्यावं लागतं. अर्थात, लोक काय म्हणतात हे मी तितकसं मनावर घेत नाही. माझ्या मते मी शंभर टक्के normal आहे. तुम्हालाही तसच वाटतं ना?