Saturday, May 24, 2008

कशी मुलगी हवी?

अखिल 'मुलीचा जन्म नको गं बाई' म्हणणा-या स्त्री-सौभाग्याला समर्पित....

'स्त्रीचं वयात येणं' हा वर्षानुवर्षे चावून चोथा झालेला विषय अाहे... अाणि तरीदेखिल समाजातील प्रगल्भ विचारवंत त्याविषयाला निवृत्ती देण्याच्या मताचे दिसत नाहीत. म्हणून मग माझ्यासारख्या क्षुद्र पामराला असे विषयांतराचे साहस करावे लागते.... असो!

तर (इथे पुरुषासाठी) वयात अाल्यावर.... "म्हणजे नक्की कधी?" हे विचारण्याचा प्रयत्न तुम्ही करणार नाहीच म्हणा. कारण उत्तरं नसलेल्यांना प्रश्न म्हणत नाहीत; ती कोडी असतात, हे अत्तापर्यंत कळलं असेलच. अाणि नसल्यास..... पण जाऊ दे... . तसेही, एका विशिष्ठ वयानंतर, तथाकथीत समंजस अाणि जाणकार मंडळी त्यानां घातलेली कोडी एका 'मंद' स्मिताने परतवत असतात. त्यांना सोडविण्याचा विपरीत उत्साह दाखवून स्वतःची (प्राण) प्रतिष्ठा पणाला लावत नसतात (इथे 'मंद' या शब्दाचा अर्थ 'किंचित' किंवा 'हळुवार' असाच घ्यावा... शब्दच्छल करण्याचे कसब माझ्या माथी मारुन स्वतःचा अपमान करुन घेऊ नये). त्यांचा अनुभव त्यांना फक्त "एवढं साधं जमत नाही होय तुला!.... नाही नाही, मी सांगणार नाही.... तुला अालंच पाहीजे.... कर, प्रयत्न कर" किंवा तत्सम उत्तराचीच परवानगी देतो. अर्थात ही काही 'वयात येण्याची' व्याख्या नसावी... कदाचित!

पण तरीदेखील साधारणतः 'सार्वजनिकदृष्ट्या' वयात येण्याचा काळ नक्की कोणता याची वैश्विक संकल्पना कूठेतरी लिहून ठेवलेली असलीच पाहीजे.... इतकेच नव्हे, तर कालानुरुप त्याच्या सुधारीत अावृत्त्याही प्रसिद्ध केल्या जात असाव्यात! कारण, पूर्वीच्या काळी जर 'वडिलांच्या चपला पायात बसू लागल्या की' हा निकष धरला तर, कालौघाने तो 'नोकरी लागली की' असा एकाचवेळी सगळीकडे दृढ होणे शक्य नाही. असो, तर सद्या त्याचे ढोबळ मानाने 'पगार ७ अाकडी झाला की' असे सोज्वळ रुपांतरण करण्यात अाले अाहे.... त्यामुळे, माझ्याबाबतीत म्हाणायचं झालं, तर अजूनतरी वयात येण्याची पाळी माझ्यावर अालेली नाही..... कदाचित ती वयात येणारही नाही! ....

असो.... तर या नाजुक 'वयात येण्याच्या' प्रक्रियेत मदतीचा हात देणारे बरेच अनुभवी पुढे येतात.... ते प्रश्नही विचारतात, अाणि उत्तरं ही तेच ठरवतात. असाच एक प्रश्न "बाबा रे, अाता जरा seriously घे लग्नाचं. काही ठरवलं अाहेस का कुठे?" .... अहंहं, जरा थांबा! याचं उत्तर चुकुनही नकारात्मक देऊ नका. 'नाही ना, वेळच मिळाला नाही कधी', किंवा 'तेवढं जमलच नाही कधी' हे ऐकायलाच त्यांचे कान अधीर असतात.... कारण मग, ते सगळं अायुष्य वर्षानुवर्षे अोळखणा-या मुलीलासुद्धा जातायेता 'hi' म्हणताना 'चुकुन कोणीतरी पाहिलं', अथवा 'तिने लक्षचं दिलं नाही तर' या भितीने उगाच अापण तिला पाहिलंच नाही अशा अविर्भावात पुढे निघून गेलेलं, एवढच काय पण त्या पाठमो-या 'प्रकरणाला' हळूच मागे वळून पहातानाही सैरभैर झालेलं बुजरं व्यक्तीमत्त्व पुरुषार्थाने अोसंडून वाहू लागतं....

अाणि समजा हा पहीला प्रश्न त्यांची उत्सुकता जिवंत ठेवू शकला, तर लगेच पूढचा तितकाच स्वाभाविक प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे 'कशी मुलगी हवी अाहे?'.... अाणि अाता खरा खेळ सुरु होतो... पण उत्तर द्यायला सुरुवात करू नका, कारण प्रश्न अजुन पुरा व्हायचा असतो... खरा पूर्ण प्रश्न काहीसा असा असतो:

" कशी मुलगी हवी अाहे?" ... कोणीतरी

"बाकी कशीही चालेल पण, मुलगी अापल्यातलीच हवी, बरं का?" ..... अाई   (हा प्रश्न अाहे?? अाणि अापाल्यातली म्हणजे 'साधारणपणे दोन पाय असलेली' किंवा 'दाढी-मिशा न ठेवणारी' का? )

"ठरवायचं तुच अाहेस, पण कमावती असेल तर तुला भविष्यात मदतच होईल".... बाबा    (म्हणजे थोडक्यात 'तिच्यावाचून माझ्या भविष्याचं काही खरं नाही' हेच म्हणायचं अाहे का तुम्हाला ?)

"देवाधर्माचं सोडू नका बाबांनो" .... अाजोबा    (अापल्या घरात देव्हारा अाहे? अाजही?? :-o )

"घरातलं सगळं नीट सांभाळणारी हवी.... घराचं घरपण, मुलांवरती संस्कार सगळं तिच्यावरच अवलंबून असतं" ..... अाजी     ( हं.... अाणि मी उगाच बाबांचा मार खायचो इतकी वर्षं)

"मनमिळाऊ पाहिजे... नाती जपली पाहिजेत".... काकू    (अाधी मुलं होऊ देत.... 'नाती'चा विचार करु सावकाश)

"दादा, मला प्रिती झिंटा अावडते, तु तिच्यासारखीच बघ हं"...."ए, नाही हं... प्रियांका चोप्रा... she is awesome"..... भगिनी-संप्रदाय    (हो, परवाच मीही ऐकलं, की त्यासुद्धा अाजकाल वर-संशोधनात busy अाहेत)

"अबे, तु baykoHavi.com वर profile का नाही बनवत?, तिथे सगळ्यात चांगली स्थळं मिळतात.... माझा तीन वर्षांचा अनुभव अाहे" ....एक मित्र    (तीन वर्ष... तगडा अनुभव अाहे मित्रा! पण अनुभव कमावण्यापासून थोडा वेळ काढून एकदा लग्न का नाही करुन टाकत?)

"अरे, ती 'अापली' मनिषा अाठवते का?... अरे मनिषा वैद्य रे... तीचं लग्न झालं. अाणि ती..".... दुसरा मित्र   (उगी उगी मित्रा! अाता जरा अापल्याबद्दल बोलूया का? त्या खुष अाहेत त्यांच्या संसारात, तुझा अाकांत ऐकायला वेळ नाही त्यांच्याकडे?)

"बायको तुझ्या field मधलीच बघणार अाहेस का? adjustment ला सोप्पं जातं ...तिसरा मित्र     (हो ना... मी अाणि माझा boss किती छान adjust केलं अाहे एकमेकांना)

"अरे लग्न लग्न म्हणजे खरं तर अगदी down-to-earth गोष्ट असते... असं नाही का वाटत तुला?".... चौथा     (खरंय रे... अजून सुरुवातही नाही झालेली अाणि मी पार धुळीला मिळालोय)

"संशोधक?? कठीण अाहे भाऊ! अाजकालच्या मुलींच्या अपेक्षा पाहिल्या अाहेस का?" ..... पाचवा      (नाही.... पण तिच्याही 'अपेक्षा' असल्याच पाहीजेत, 'अपेक्षाभंगा'ची सवय नसलेली विवाहित व्यक्ती पाहिली अाहेस कधी?)

"तुझ्यासाठी स्थळं बघत अाहेत का? अपेक्षा सांगून ठेव.... अाम्ही निशांतसाठी बघतोच अाहोत, एखादी वाटली तर सुचवू तुला" .... निशांतची अाई (okkay काकू... निशांतला profile forward करायला सांगत जा... किंवा मग अापण एक common group च बनवूया की, 'या...बघा' किंवा 'कांदेपोहे' नावाचा)


अाणि प्रश्न संपतच नाहीत.... एवढ्या तत्पर मदतनीसांच्या गोंधळात तो मात्र एकटा असतो.... "बायको" हि "मैत्रीण" हवी हे त्याला मान्य असतं... पण मित्र निवडताना त्याने तंतोतंत कोणत्या मागण्या किंवा अपेक्षा ठेवलेल्या असतात हे काही केल्या त्याला अाठवत नसतं.... शेवटी, दहा जणांच्या घोळक्यात दोन जणं कधीतरी त्याचे मित्र झालेले असतात, पण 'का' हे काही त्याला उमगत नाही..... बायको सुंदर अाहे की नाही, सुशिक्षित अाहे की नाही, कमावती अाहे की नाही, 'इतरां'साठी मनमिळाऊ अाहे की नाही, 'इतर' नाती जपणारी अाहे की नाही किंवा त्याच्या profession मधली अाहे की नाही हे सगळे प्रश्न अगदी वरवरचे असतात.... त्याला तिच्यात मित्र भेटतो की नाही, किंवा तिच्यात "तो स्वत:ला" पाहू शकतो की नाही हे प्रश्न त्याला जास्ती महत्वाचे वाटतात... मग अशा सख्यासाठी तो जग जिंकायलाही तयार असतो..... 

पण 'म्हणजे नेमकं कोण' हे उत्तर त्याच्याकडे नसतं.... ते कदाचित कुणाकडेच नसतं ..... कारण 'कशी मुलगी हवी?' या प्रश्नात फक्त सुरुवात असते....उरलेलं अख्खं अायुष्य या प्रश्नाचं उत्तर अाजतरी मिळेल या एका अाशेवर व्यतीत होत जातं..... कोणतीही व्यक्ती म्हणजे काही एखादं पुस्तक नसतं.... हातातलं झटक्यात वाचून संपवायचं अाणि नवीन सुरु करायचं. ते एक वृत्तपत्र असतं..... संध्याकाळपर्यंत भलेही ते जूनं वाटायला लागत असेल, पण शिळं होण्याअगोदरच रोज सकाळी त्याची एक नविन अावृत्ती हातात येते.... अाणि व्यक्तिविलासाचा एक नवा अध्याय सुरु होतो.

थोडक्यात काय, तर 'स्त्री' प्रमाणेच 'पुरुष' प्राण्याचे वयात येणे हे देखिल तितकेच कठीण असते.... स्त्रीची शारीरीक वाताहत तिथे पुरुषाची मानसिक गळचेपी.... स्त्रीला मातृत्वाचा हक्क मिळतो तिथे पुरुषाला पितृत्वसंस्करणाची कर्तव्य बोचायला लागतात.... म्हणतात ना, 'स्त्री-पुरुष', 'हक्क-कर्तव्य' एकाच नाण्याच्या दोन बाजु असतात... खरं अाहे ते....