Tuesday, December 19, 2006

दर्भाचा कावळा

परतीचा प्रवास सुरू होतो आणि इतकावेळ तुंबुन राहिलेला थकवा शरिरावर झडप घालतो. सुरकुतलेला उत्साह, मातकटलेले कपडे, घामाने भिजलेले रुमाल आणि मधूनच आपल्या असण्याचा पुरावा नाकपुड्यांद्वारे पोहोचवणारे मोजे त्यांनी घेतलेल्या अनन्त आनंदोत्सवाचे गाणे आरवत असतात. एस. टी. चा लाल डबासुद्धा त्यांना स्वर्ग वाटू लागतो. शरिराने आणि मनाने झाल्या समाधानाची पोच केव्हाच दिलेली असते. आता फक्त घरी पोहोचण्याचा अवकाश.... कि इन्द्रियांत तुडुंब कोंबलेल्या आठवणी धरण तुटलेल्या नदीप्रमाणे मोकाट सुटणार असतात.

आसनावर बसल्या बसल्या त्यांचे चौकोनी संभाषण सुरु होते.... गेल्या दोन दिवसातले गोड अनुभव, नाविन्याचा हर्षोल्हास, घडलेले विनोद, झालेली फजिती यांची उजळणी सुरू होते. घरातून निघाल्यापासुन ते अगदी आत्ता गाडीत चढेपर्यंतचा इतिहास वाचला जातो...चाखला जातो! मध्येच कधीतरी उरलेल्या फरळाच्या पिशव्या बाहेर पडतात... रिकाम्या होतात. मग केव्हातरी वातावरण शमतं. बसने खाचखळग्यातुन जाताना दिलेल्या हिन्दोळ्यावरती झोपेचा लपंडाव सुरु होतो. अचानक कुठलासा स्टॅण्ड लागतो... चहाच्या फेऱ्या झडतात.... आणि कुठुनतरी त्यांचे शेवटच्या आसनावर लक्ष जाते..... तो जो पाचवा असतो, तो झोपलेला असतो.... एकटाच... उरलेल्या सीटवर सन्तुष्ट होवून.

बसमध्ये एकत्र चढलेल्या त्यांच्यात तो सुद्धा असतो... पण नात्यांच्या जंजाळात तो सगळ्यात मागे पडलेला असतो... त्याच्याही नकळत... सुरुवातीला दु:खी झालेला तो मग आलेल्या परिस्थितीला आपलसं करतो आणि समाधान मानतो... त्याच्या स्वत:च्या जगापुरता...

त्या चौघांनाही त्याची फारशी तमा नसते... उलट, त्याच्या एकलकोंड्या ध्यानावर त्यांना हसू येते... तो आपला असतो, म्हणुन ते हसु दाबायचं ही नसतं आणि मिरवायचं ही. त्यानेसुद्धा ते सोसायचं नसतं आणि भोगयचं ही नाही. आनंद, दु:ख यांच्यापलीकडे जाण्याची ती एक परिक्षा मानुन तिला सामोरं जायचं असतं.

आणि त्यात चुकलच कुठे हो? शेवटी त्याचं अस्तित्व वर्तुळच्या मध्यासारखे असते. परिघाशी एक अतुट नातं असतं. पण म्हणून त्याच्याशी जवळीक साधाण्याचा वेडेपणा करता येत नाही. तो एक दर्भाचा कावळा असतो. त्याचे आयुष्य खऱ्या कावळ्यांनंतर सुरू होते आणि पिंडाच्या स्पर्शाने मावळते. तेवढीच त्याची गरज... आणि तिच त्याची रया. घडाभर संसारात घडीभरही आयुष्य वाटेला आले नाही म्हणून रडण्यापेक्षा मिळालेल्या टिचभर वेळेत इतर कावळ्यांनी नाकारलेल्या पिंडाला शिवुन तिथे जमलेल्या असंख्य चेहऱ्यांवरचे समाधान टिपुन आपला अवतार त्याने आटोपता घ्यायचा असतो. "जिथे कमी तिथे आम्ही", हेच त्याचे ब्रिदवाक्य असते... विपुलतेत त्याला स्थान नसते!

प्रवास संपतो... इतकावेळ दाबुन ठेवलेली त्याची चर्या उफळुन वर येते... तो झपाझप पावले टाकत घर गाठतो.


संध्याकाळी ते सगळे एकत्र भेटतात... तो ही तिथेच असतो.... "घरि आल्यावर अंग दुखायला लागलं नाही?",पहिला.... "मी तर चक्क तास्भर आंघोळ केली... मस्त फ्रेश वाटतयं", दुसरी..... तिसरा मग आलेल्या संधीचा फायदा घेत त्याला विचारतो "घरि गेल्यावर मग सगळं ठिक ठाक झालं ना?"......

सगळ्याकडे पहात तो मग मन्द हसतो....दर्भाला पून्हा एकदा पालवि फुटलेली असते... पून्हा एकदा कावळा होण्यासाठी!