Monday, April 19, 2010

वाचन व्या..दंगेखोर

-->
"अरेऽऽ प्रसंगी रस्त्यावरच्या दिव्याखाली वाचन करुन दिवस काढले आहेत!", असं म्हणणा-या भल्याभल्या वाचनप्रेमींना फेंफरं आणतील असे व्यासंगी मुंबईच्या रेल्वे गाड्यांतून सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळांत प्रवास करताना भेटतात. एकाचा डावा खांदा दुस-याच्या उजव्या काखेत हरवेपर्यंत खच्चून भरलेल्या गर्दीत आणि आत येताना आपल्या मुख्य शरीराबरोबर आणलेले accessary अवयव अजूनही जवळपासच असतील आणि योग्यवेळी ते आपल्याबरोबरच बाहेर पडतीलच याची कुठलीही खात्री नसतानादेखील एखादा बहाद्दर हातात अठ्ठ्यात्तर ठिकाणी दुमडलेलं वर्तमानपत्र चाळण्यात मग्न असतो. त्याच्या आजुबाजूचे तिन-चार जण मग मिळेल त्या angle ने आणि लाभेल तेवढा perspective वापरत स्वतःची वाचन-तृष्णा शमविण्याचे सगळे प्रयत्न पणाला लावताना दिसतात.
स्वाभाविकपणे, तो म्होरक्या त्याच्या आवडी-निवडीला प्रामाणिक राहून स्वतःच्या वाचनवेगानुसार पानं उलट-पालट करत राहतो आणि त्याचे इतर आगंतुक वाचक-स्नेही आधीच्या अर्धवट वाचलेल्या मथळ्यातून पुढच्या मथळ्यात प्रवेश करत राहतात. सामान्यतः या बदलाला adjust/adopt होण्याची निसर्गदत्त क्षमता प्रत्येकातच असते. पण या उत्क्रांत-मेंदुच्या मोबदल्यात आपण किती मोठ्या मनोरंजनाला मुकलो आहोत हे पडताळण्यासाठी केलेला हा प्रयोग:
स्थळ: लोणावळा-पूणे लोकल
वृत्तपत्र: लोकमत, दिनांक १७ एप्रिल २०१० ची पूणे आवृत्ती
(सुसंगतीसाठी पान-बदलाचे संकेत दोन सलग स्वल्पविरामांनी ,, आयोजिले आहे, तरी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा.)
"माझ्यावरील आरोप बिनबुडाचे" - शशी थरुर
परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरुर यांच्या राजिनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी गोंधळ घातल्याने लोकसभा राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करावे लागले. आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना थरुर यांनी केलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे, " माझ्यावरील आरोप बिनबूडाचे आहेत,, मी पाकिस्तानची बहू नक्कीच नाही. मी केवळ शोएबची बीवी आहे. मी पाकिस्तानशी विवाह केलेला नाही; तर एका पुरुषाशी निकाह केलेला आहे. काही लोक या निकाहाला राजकिय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना ते करु द्या".

मदरशात कुराण, बायबल, वेदाचे धडे
उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद जिल्ह्यातील संगम नगरीच्या करेली भागात एका मदरशात कुराण, बायबल आणि वेदाचे धडे सोबतच दिले जातात. इस्लामिक एज्युकेशन अँड रिसर्च ऑर्गनायझेशनच्या अखत्यारीत सुरु असलेल्या या मदरशाचा,, शोध घेण्यासाठी इस्रोच्या वरिष्ठ संशोधकांची उद्या थिरुवअनंतपूरम् येथे बैठक होत आहे. बैठकित या मोहिमेच्या अपयशाची कारणे शोधली जाणार आहेत

समाजाभिमुख गुलाबमामा
चाकणजवळील राणूबाई मळ्यातील मतदारसंघातून सतत २५ वर्षे निवडून येणारे गुलाबमामा लेंढघर सर्व परिचित आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची ३१ वर्षे साजरी करताना अनावश्यक खर्च टाळून त्या रकमेतून ३१ आदिवासी कुटुंबांना चादरी, त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके वाटप केले. ते नेहमी म्हणतात,, "भारत-पाक संबंध सुधारण्याच्या शक्यतेतूनच भुत्तोंची हत्या झाली आहे!".
(मधल्या काही वेळात नाटक-सिनेमे यांच्या जाहिराती, वधु-वर सुचकता अाणि सरकारी टेंडर्सनी भरलेली पाने वाचून वाचल्यासारखी फडफडतात... पण, त्यातूनही head-liners मात्र सुटत नाहीत.)

महाराष्ट्र संपादक परिषदेच्या कार्याचा छगन भुजबळ यांच्याकडून गौरव,, जेथे 'धन' तेथेच 'फन'

दुल्हेराजा आँफर! लग्न करताय? डोकं लढवा,, होमियोपॅथी वापरा, केस गळती थांबवा.

शहरात साखरेचा भाव तीस रुपये किलो...,, अनोळखी महिला ठार, ओळख पटविणा-यास,, जागा देणे आहे

सुरक्षित शहरे?
काही दिवसांपुर्वीपासून हिंजवडी, पिंपळेगुरव, मुंबई याठिकाणी विवाहितेवर, तरुणींवर बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत,, यावरुन शिक्षणक्षेत्रात चंगळवादाची परिसीमा गाठल्याचे दिसले. ही कृती अतिशय घृणास्पद आहे,, हा थकवा दूर करण्यासाठी विश्रांतीची गरज असते. किंबहूना शिक्षकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुट्टी आवश्यकच आहे. मे महिन्याच्या सुटीच्या काळात त्यांच्यावर निवडणूका, जनगणना किंवा अन्य कोणतीही अशैक्षणिक कामे लादू नयेत.

घरोघरी कचरा गोळा करणा-यांना पुणे महापालिकाच देणार,, कांदा-कोबीची पचडी
साहित्य: बारीक चोचवलेला कांदा, चिरलेला पांढरा कांदा, पाव वाटी ओला मटार, अर्धी वाटी ओले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, लिंबाचा रस, फोडणीसाठी तेल
कृती: ...

No comments: