पूर्वी केव्हातरी काळाच्या वावटळीत स्वतःला सावरताना हातातून उडालेले कल्पनातंतू, अाज पून्हा गुंतवळ बनून पायाशी अाले... अाणि
Monday, April 19, 2010
वाचन व्या..दंगेखोर
Saturday, April 10, 2010
नशीब, दुसरं काय?
कधी विचार केला अाहे, असं (नाही, असंच) का होतं याबद्दल?
गृहपाठ केलेला नसेल तेव्हाच इतिहासाचे "अौरंगजेब" मास्तर वह्या तपासायला का मागतात? option ला टाकलेली गणितंच नेमकी परिक्षेत का येतात? अाणि जीवाच्या अाकांताने सर्व syllabus पूर्ण करून जय्यत तयारीनिशी सोडवलेला पेपरच नेमका कसा काय फुटतो? cutter नसतानाच पेन्सिलीचं टोक कसं बरं तुटतं? ते अख्ख्या वर्गात नेमकं परवाच भांडण झालेल्या मित्राकडेच का असतं? अभ्यासात हुष्षार अाणि घरकामात नीटनेटकी मैत्रिण सगळ जग पालथं घालून शेवटी अापल्याच शेजारच्या building मध्ये का रहायला येते? येते तर येऊ द्यात, पण नेमकी तिचीच अाई माझ्या अाईच्याच भिशी-मंडळात का दाखल होते? इतर वेळी दारात उभ्या राहूनसुद्धा फक्त वरच्या कुळकर्णी अाणि पलिकडच्या देशपांडे एवढ्यावरच गप्पा मारणा-या अाया, मग अशा casual पार्टीजमध्ये "मुलांची शैक्षणिक घोडदौड" यासारख्या माझ्या शिक्षकालाही न समजलेल्या गहन विषयावर का चर्चा करतात?
मी छत्री विसरलो तरच पाऊस का येतो? अाणि पाऊस नाहीच अाला, तर मी बसमध्ये बसलेल्या दिशेलाच सूर्यदेव हजेरी कशी काय लावतो? मी उभा असलेली रांगच नेहमी सगळ्यात हळू का बरं पुढे सरकते? कंटाळून तिकिट काढलेलं नसतानाच, इतर वेळी ढुंकुनही न बघणारा t.c. माझं अागत्यानं स्वागत का बरं करतो? प्रवासात माझ्याशेजारी नेहमी अाजीच कशा काय बसतात? अगदी लांबपल्ल्याच्या प्रवासातसुद्धा नेमकी मी बसलेली bogie च bachelors' special किंवा mens only कोण घोषित करतं?
जगातल्या सगळ्या सुंदर मुली नेहमी अनोळखीच का असतात? त्यांची अोळख करुन देवू शकणारे सगळेच rational thinker का असतात? त्यांच्या मते ती "तश्या" टाईपची मुलगी का नसते? असं असूनही मग वर्गातल्या सर्वात सुंदर अशा "ती"ची, एखाद-दुसरी तुकडीच काय, पण अगदी तिन-चार मजले किंवा तितक्याच इयत्ता पार करून शेवटी सामान्यातिसामान्य अशा "त्या"च्याशी कोण अोळख करून देते? इतर वेळी फक्त तिन हात सोडून बसलेल्या, जगातल्या एकमेवाद्वितीय smart माझ्याकडे कधी एक साधा कटाक्षही टाकण्याची तसदी न घेणा-या तिला, मी जगापासून विरक्त होऊन अाणि जगाच्या अागंतुकतेच्या सगळ्या शक्यता चूकवत तिच्याच ध्यानसाधनेत मग्न असतानाच नेमकी माझ्यावर नजर टाकण्याची गरज का भासते? अाणि तशातच इतर वेळी दिड फुटावर धरलेल्या माझ्या पेपरातील वजाबाकीचं चिन्ह चष्मा लाऊनही न दिसणा-या गणिताच्या बाईंना सत्तावन्न बाकं दूरवर चाललेला अामच्यातला परस्पर-व्यवहार कसा काय अचूक दिसतो?
मी गबाळ्यासारखा रमत-गमत फिरतानाच ती रस्त्यात अाडवी का येते? इतर वेळी माग काढूनसुद्धा न सापडणा-या तिच्या पत्त्यावर नेमका अाईने दिलेली कापडी झोळी खांद्याला लटकवून डागाळलेल्या अर्धचड्डीवर अाणि bathroom चप्पल पायात असतानाच मी कसा काय जाऊन थडकतो? दुस-या खेपेला मस्त डागडूजी करून गेल्यावर मात्र ती का बरं घरात नसते? नवीन कपडे घालून जात असतानाच नेमका चिखल कसा काय उडतो? अाणि त्या रिक्षावाल्याला एक सणसणीत शिवी घालत असतानाच तीची अाई कशी काय बाल्कनीत येते?
श्रीमंत वडील, प्रेमळ अाई, समजूतदार बहिणी अाणि सुंदर बायको ह्या नेहमी मित्रांच्याच घरी का बरं सापडतात? कितीही प्रेमळ निघाली तरी नेमके अापल्याला अावडणारे पदार्थ खाण्यावरच अाईचा मज्जाव का बरं असतो? प्रसंगी 'या कानाचं त्या कानाला कळणार नाही' इतक्या सराईतपणे लाडू पळवता येणा-या माझ्या हातून डब्याचं झाकण नेमकं अाई झोपलेली असतानाच कसं काय निसटतं? पडलं तर पडलं, पण अाईची झोप मोडली नसताना, अगदी अलगत ते झाकण उचलायच्या प्रयत्नात ते परत परत पडून अावाज का बरं होतो? अाईची झोप मोडलीच नाही असं का होत नाही?
कितीही विश्वास ठेवायचा नाही ठरवलं तरी नेहमी 'सांगितलेलं भविष्य खरं ठरलेली' माणसंच मला कशी काय भेटतात? नवसाला फळ न अालेले भक्त कधीच का भेटत नाहीत? मला पोहोचायला उशिर होत असेल तेव्हाच नाटक कसं काय वेळेवर सुरु झालेलं असतं? त्यातूनही इतर वेळी सूम्म असलेला माझा फोन नेमका नाटक सुरु असतानाच कसा काय मॅडसारखा अोरडू लागतो?
का?... असच का?....
नशीब! दुसरं काय!!... बरोबर? अजिबात नाही. म्हणजे माझ्यामते तरी नाहीच! सांख्यिकी (statistics) च्या भाषेत बोलायचं झालं तर biased sampling चा इफेक्ट. पेन्सिलीचं टोक तुटण्यापासून ते ज्योतिषशास्त्राच्या यशापर्यंत, अगदी तेच! कसं ते तुम्ही शोधा. पण मी एवढंच सांगेन की, अापण काही अाठवणी किंवा गोष्टी खूप जास्त जपून ठेवतो, तर काही अापल्या लक्षातही येत नाहीत. अाणि इतर वेळी अापली "यश मिळेपर्यंत न थांबण्याची" चिकाटी कारणीभूत ठरते.
काही दिवसांपूर्वी माझी एक शाळेतली वर्गमैत्रिण भेटली होती. ती सांगत होती, "तिन मजले पार करणा-या तिला, तिन हातावरचा बाकडा अोलांडणं मात्र फार फार कठीण गेलं होतं".
Saturday, May 24, 2008
कशी मुलगी हवी?
'स्त्रीचं वयात येणं' हा वर्षानुवर्षे चावून चोथा झालेला विषय अाहे... अाणि तरीदेखिल समाजातील प्रगल्भ विचारवंत त्याविषयाला निवृत्ती देण्याच्या मताचे दिसत नाहीत. म्हणून मग माझ्यासारख्या क्षुद्र पामराला असे विषयांतराचे साहस करावे लागते.... असो!
तर (इथे पुरुषासाठी) वयात अाल्यावर.... "म्हणजे नक्की कधी?" हे विचारण्याचा प्रयत्न तुम्ही करणार नाहीच म्हणा. कारण उत्तरं नसलेल्यांना प्रश्न म्हणत नाहीत; ती कोडी असतात, हे अत्तापर्यंत कळलं असेलच. अाणि नसल्यास..... पण जाऊ दे... . तसेही, एका विशिष्ठ वयानंतर, तथाकथीत समंजस अाणि जाणकार मंडळी त्यानां घातलेली कोडी एका 'मंद' स्मिताने परतवत असतात. त्यांना सोडविण्याचा विपरीत उत्साह दाखवून स्वतःची (प्राण) प्रतिष्ठा पणाला लावत नसतात (इथे 'मंद' या शब्दाचा अर्थ 'किंचित' किंवा 'हळुवार' असाच घ्यावा... शब्दच्छल करण्याचे कसब माझ्या माथी मारुन स्वतःचा अपमान करुन घेऊ नये). त्यांचा अनुभव त्यांना फक्त "एवढं साधं जमत नाही होय तुला!.... नाही नाही, मी सांगणार नाही.... तुला अालंच पाहीजे.... कर, प्रयत्न कर" किंवा तत्सम उत्तराचीच परवानगी देतो. अर्थात ही काही 'वयात येण्याची' व्याख्या नसावी... कदाचित!
पण तरीदेखील साधारणतः 'सार्वजनिकदृष्ट्या' वयात येण्याचा काळ नक्की कोणता याची वैश्विक संकल्पना कूठेतरी लिहून ठेवलेली असलीच पाहीजे.... इतकेच नव्हे, तर कालानुरुप त्याच्या सुधारीत अावृत्त्याही प्रसिद्ध केल्या जात असाव्यात! कारण, पूर्वीच्या काळी जर 'वडिलांच्या चपला पायात बसू लागल्या की' हा निकष धरला तर, कालौघाने तो 'नोकरी लागली की' असा एकाचवेळी सगळीकडे दृढ होणे शक्य नाही. असो, तर सद्या त्याचे ढोबळ मानाने 'पगार ७ अाकडी झाला की' असे सोज्वळ रुपांतरण करण्यात अाले अाहे.... त्यामुळे, माझ्याबाबतीत म्हाणायचं झालं, तर अजूनतरी वयात येण्याची पाळी माझ्यावर अालेली नाही..... कदाचित ती वयात येणारही नाही! ....
असो.... तर या नाजुक 'वयात येण्याच्या' प्रक्रियेत मदतीचा हात देणारे बरेच अनुभवी पुढे येतात.... ते प्रश्नही विचारतात, अाणि उत्तरं ही तेच ठरवतात. असाच एक प्रश्न "बाबा रे, अाता जरा seriously घे लग्नाचं. काही ठरवलं अाहेस का कुठे?" .... अहंहं, जरा थांबा! याचं उत्तर चुकुनही नकारात्मक देऊ नका. 'नाही ना, वेळच मिळाला नाही कधी', किंवा 'तेवढं जमलच नाही कधी' हे ऐकायलाच त्यांचे कान अधीर असतात.... कारण मग, ते सगळं अायुष्य वर्षानुवर्षे अोळखणा-या मुलीलासुद्धा जातायेता 'hi' म्हणताना 'चुकुन कोणीतरी पाहिलं', अथवा 'तिने लक्षचं दिलं नाही तर' या भितीने उगाच अापण तिला पाहिलंच नाही अशा अविर्भावात पुढे निघून गेलेलं, एवढच काय पण त्या पाठमो-या 'प्रकरणाला' हळूच मागे वळून पहातानाही सैरभैर झालेलं बुजरं व्यक्तीमत्त्व पुरुषार्थाने अोसंडून वाहू लागतं....
अाणि समजा हा पहीला प्रश्न त्यांची उत्सुकता जिवंत ठेवू शकला, तर लगेच पूढचा तितकाच स्वाभाविक प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे 'कशी मुलगी हवी अाहे?'.... अाणि अाता खरा खेळ सुरु होतो... पण उत्तर द्यायला सुरुवात करू नका, कारण प्रश्न अजुन पुरा व्हायचा असतो... खरा पूर्ण प्रश्न काहीसा असा असतो:
" कशी मुलगी हवी अाहे?" ... कोणीतरी
"बाकी कशीही चालेल पण, मुलगी अापल्यातलीच हवी, बरं का?" ..... अाई (हा प्रश्न अाहे?? अाणि अापाल्यातली म्हणजे 'साधारणपणे दोन पाय असलेली' किंवा 'दाढी-मिशा न ठेवणारी' का? )
"ठरवायचं तुच अाहेस, पण कमावती असेल तर तुला भविष्यात मदतच होईल".... बाबा (म्हणजे थोडक्यात 'तिच्यावाचून माझ्या भविष्याचं काही खरं नाही' हेच म्हणायचं अाहे का तुम्हाला ?)
"देवाधर्माचं सोडू नका बाबांनो" .... अाजोबा (अापल्या घरात देव्हारा अाहे? अाजही?? :-o )
"घरातलं सगळं नीट सांभाळणारी हवी.... घराचं घरपण, मुलांवरती संस्कार सगळं तिच्यावरच अवलंबून असतं" ..... अाजी ( हं.... अाणि मी उगाच बाबांचा मार खायचो इतकी वर्षं)
"मनमिळाऊ पाहिजे... नाती जपली पाहिजेत".... काकू (अाधी मुलं होऊ देत.... 'नाती'चा विचार करु सावकाश)
"दादा, मला प्रिती झिंटा अावडते, तु तिच्यासारखीच बघ हं"...."ए, नाही हं... प्रियांका चोप्रा... she is awesome"..... भगिनी-संप्रदाय (हो, परवाच मीही ऐकलं, की त्यासुद्धा अाजकाल वर-संशोधनात busy अाहेत)
"अबे, तु baykoHavi.com वर profile का नाही बनवत?, तिथे सगळ्यात चांगली स्थळं मिळतात.... माझा तीन वर्षांचा अनुभव अाहे" ....एक मित्र (तीन वर्ष... तगडा अनुभव अाहे मित्रा! पण अनुभव कमावण्यापासून थोडा वेळ काढून एकदा लग्न का नाही करुन टाकत?)
"अरे, ती 'अापली' मनिषा अाठवते का?... अरे मनिषा वैद्य रे... तीचं लग्न झालं. अाणि ती..".... दुसरा मित्र (उगी उगी मित्रा! अाता जरा अापल्याबद्दल बोलूया का? त्या खुष अाहेत त्यांच्या संसारात, तुझा अाकांत ऐकायला वेळ नाही त्यांच्याकडे?)
"बायको तुझ्या field मधलीच बघणार अाहेस का? adjustment ला सोप्पं जातं ...तिसरा मित्र (हो ना... मी अाणि माझा boss किती छान adjust केलं अाहे एकमेकांना)
"अरे लग्न लग्न म्हणजे खरं तर अगदी down-to-earth गोष्ट असते... असं नाही का वाटत तुला?".... चौथा (खरंय रे... अजून सुरुवातही नाही झालेली अाणि मी पार धुळीला मिळालोय)
"संशोधक?? कठीण अाहे भाऊ! अाजकालच्या मुलींच्या अपेक्षा पाहिल्या अाहेस का?" ..... पाचवा (नाही.... पण तिच्याही 'अपेक्षा' असल्याच पाहीजेत, 'अपेक्षाभंगा'ची सवय नसलेली विवाहित व्यक्ती पाहिली अाहेस कधी?)
अाणि प्रश्न संपतच नाहीत.... एवढ्या तत्पर मदतनीसांच्या गोंधळात तो मात्र एकटा असतो.... "बायको" हि "मैत्रीण" हवी हे त्याला मान्य असतं... पण मित्र निवडताना त्याने तंतोतंत कोणत्या मागण्या किंवा अपेक्षा ठेवलेल्या असतात हे काही केल्या त्याला अाठवत नसतं.... शेवटी, दहा जणांच्या घोळक्यात दोन जणं कधीतरी त्याचे मित्र झालेले असतात, पण 'का' हे काही त्याला उमगत नाही..... बायको सुंदर अाहे की नाही, सुशिक्षित अाहे की नाही, कमावती अाहे की नाही, 'इतरां'साठी मनमिळाऊ अाहे की नाही, 'इतर' नाती जपणारी अाहे की नाही किंवा त्याच्या profession मधली अाहे की नाही हे सगळे प्रश्न अगदी वरवरचे असतात.... त्याला तिच्यात मित्र भेटतो की नाही, किंवा तिच्यात "तो स्वत:ला" पाहू शकतो की नाही हे प्रश्न त्याला जास्ती महत्वाचे वाटतात... मग अशा सख्यासाठी तो जग जिंकायलाही तयार असतो.....
थोडक्यात काय, तर 'स्त्री' प्रमाणेच 'पुरुष' प्राण्याचे वयात येणे हे देखिल तितकेच कठीण असते.... स्त्रीची शारीरीक वाताहत तिथे पुरुषाची मानसिक गळचेपी.... स्त्रीला मातृत्वाचा हक्क मिळतो तिथे पुरुषाला पितृत्वसंस्करणाची कर्तव्य बोचायला लागतात.... म्हणतात ना, 'स्त्री-पुरुष', 'हक्क-कर्तव्य' एकाच नाण्याच्या दोन बाजु असतात... खरं अाहे ते....
Tuesday, December 19, 2006
दर्भाचा कावळा
आसनावर बसल्या बसल्या त्यांचे चौकोनी संभाषण सुरु होते.... गेल्या दोन दिवसातले गोड अनुभव, नाविन्याचा हर्षोल्हास, घडलेले विनोद, झालेली फजिती यांची उजळणी सुरू होते. घरातून निघाल्यापासुन ते अगदी आत्ता गाडीत चढेपर्यंतचा इतिहास वाचला जातो...चाखला जातो! मध्येच कधीतरी उरलेल्या फरळाच्या पिशव्या बाहेर पडतात... रिकाम्या होतात. मग केव्हातरी वातावरण शमतं. बसने खाचखळग्यातुन जाताना दिलेल्या हिन्दोळ्यावरती झोपेचा लपंडाव सुरु होतो. अचानक कुठलासा स्टॅण्ड लागतो... चहाच्या फेऱ्या झडतात.... आणि कुठुनतरी त्यांचे शेवटच्या आसनावर लक्ष जाते..... तो जो पाचवा असतो, तो झोपलेला असतो.... एकटाच... उरलेल्या सीटवर सन्तुष्ट होवून.
बसमध्ये एकत्र चढलेल्या त्यांच्यात तो सुद्धा असतो... पण नात्यांच्या जंजाळात तो सगळ्यात मागे पडलेला असतो... त्याच्याही नकळत... सुरुवातीला दु:खी झालेला तो मग आलेल्या परिस्थितीला आपलसं करतो आणि समाधान मानतो... त्याच्या स्वत:च्या जगापुरता...
त्या चौघांनाही त्याची फारशी तमा नसते... उलट, त्याच्या एकलकोंड्या ध्यानावर त्यांना हसू येते... तो आपला असतो, म्हणुन ते हसु दाबायचं ही नसतं आणि मिरवायचं ही. त्यानेसुद्धा ते सोसायचं नसतं आणि भोगयचं ही नाही. आनंद, दु:ख यांच्यापलीकडे जाण्याची ती एक परिक्षा मानुन तिला सामोरं जायचं असतं.
आणि त्यात चुकलच कुठे हो? शेवटी त्याचं अस्तित्व वर्तुळच्या मध्यासारखे असते. परिघाशी एक अतुट नातं असतं. पण म्हणून त्याच्याशी जवळीक साधाण्याचा वेडेपणा करता येत नाही. तो एक दर्भाचा कावळा असतो. त्याचे आयुष्य खऱ्या कावळ्यांनंतर सुरू होते आणि पिंडाच्या स्पर्शाने मावळते. तेवढीच त्याची गरज... आणि तिच त्याची रया. घडाभर संसारात घडीभरही आयुष्य वाटेला आले नाही म्हणून रडण्यापेक्षा मिळालेल्या टिचभर वेळेत इतर कावळ्यांनी नाकारलेल्या पिंडाला शिवुन तिथे जमलेल्या असंख्य चेहऱ्यांवरचे समाधान टिपुन आपला अवतार त्याने आटोपता घ्यायचा असतो. "जिथे कमी तिथे आम्ही", हेच त्याचे ब्रिदवाक्य असते... विपुलतेत त्याला स्थान नसते!
प्रवास संपतो... इतकावेळ दाबुन ठेवलेली त्याची चर्या उफळुन वर येते... तो झपाझप पावले टाकत घर गाठतो.
संध्याकाळी ते सगळे एकत्र भेटतात... तो ही तिथेच असतो.... "घरि आल्यावर अंग दुखायला लागलं नाही?",पहिला.... "मी तर चक्क तास्भर आंघोळ केली... मस्त फ्रेश वाटतयं", दुसरी..... तिसरा मग आलेल्या संधीचा फायदा घेत त्याला विचारतो "घरि गेल्यावर मग सगळं ठिक ठाक झालं ना?"......
सगळ्याकडे पहात तो मग मन्द हसतो....दर्भाला पून्हा एकदा पालवि फुटलेली असते... पून्हा एकदा कावळा होण्यासाठी!
Thursday, October 12, 2006
(वि)चित्रवारी
सहाजिकच अशा या मराठमोळ्या कर्यक्रमाला उपस्थितीही तशीच मराठी बाण्याची असते हे वेगळं सांगायला नको. नेहमीप्रमाणे, एखाद्या मध्यमवर्गीय समाजाला शोभेल असे, आम्ही वेळेआधी पुरते अर्धा तास हजर झालेलो असतो. ( त्यात वेळेचं महत्त्व किती आणि दिलेल्या पासेसवर आसनक्रमांक नसल्याने योग्य जागा मिळविण्याची middle-class धडपड किती, हा मुद्दा तितकासा महत्त्वाचा नसतो... आणि तसे असले तरी, यात आमचा गुन्हा असा काहीच नसतो. कारण, बाकी सर्व जग जरी बदललं, तरी मराठी माणूस त्याच्या मध्यमवर्गीय गुणांना जागतो, हा निसर्गनियमच आहे. ) तसं उशीर होण्यासाठी आमच्यात स्त्रिलिंगी जोडव्यक्ति कोणीच नसते हेही कारण महत्त्वाचं! (कदाचित हाही एक मध्यमवर्गीय नियम ठरावा) आणि असं असुन सुद्धा बेलाला पाने तिनच या उक्तिप्रमाणे, तिथे पोहोचणारे आम्ही बहुदा शेवटचेच असतो.
ठरल्यावेळेपेक्षा चित्रपट फक्त अर्धा तास उशिरा सुरु होणार असतो. आणि त्यामुळे चित्रपटाआधीच्या काही घटिका आम्हाला अशा चहुकडून उधार मिळलेल्या क्षणांवर उजळाव्या लागतात. आम्ही आसनावर बसल्याबसल्या औत्सुक्यसुलभ हालचाली सुरु ठेवतो आणि आजुबाजुला व्यक्तिस्वातंत्र्याचे नवनवीन अविष्कार उलगडत जातात.
" गुजरते वहिनी, तुम्ही इकडे बसा"
"हे तुझं नेहेमीचंच आहे..."
" हि खुर्चीपण तुम्हीच घेतलीत... कमालच आहे!"
" अहो जरा खाली सरका ना, समोरचं दिसत नाही"
"अरे! काय म्हणता... आणि, परवा ब्रा. सं. च्या बैठकीला आला नाहीत... वसन्तराव काय झकास बोलले म्हणून सांगू "
" माझ्यासाठी एक popcorn "
"श्शी:!... गरज असेल तेव्हा याचा फोन कधी लागलाय?.... फेकून दे म्हणावं त्याला!"
"तरी घरातून निघताना दहावेळा विचारलं होत... आता बस तसाच, पिक्चर संपेपर्यंत!"
" अहो जरा A/C कमी करता येईल का?"
"यावेळी तरी mic ची व्यवस्था करा म्हणावं.... मागच्यावेळी काही ऐकुच येत नव्हतं.... "
"छे हो! ती कसली येतेयं.... तीला असले कौटुंबिक सिनेमे आवडत नाहीत"
"येताना दुध तापवत ठेवलं होतं... गॅस बंद केला होता का हो तुम्ही? "
"लास्ट रो... थर्ड चेअर..."
"एक्सक्युज मी.... "
"काय हो? ही परांजप्यांची चारु ना?....."
"अरे तू एक सीट तिकडे सरक, रेणुका तिथे बसेल... आणि विजयराव तुम्ही पलिकडे !"
अशा अनोळखी, पण तरीही अंगवळणी पडलेल्या कल्लोळात पहिली पंधरा-एक मिनिटे सहज सरतात. पुढची काही पडद्यावर सरकणाऱ्या जाहिरातींमध्ये जातात. अशा जाहिराती मध्यमवर्गीय माणसाने लक्ष देऊन पाहाव्यात जरूर, पण लक्षात मात्र ठेऊ नयेत. कारण, ज्याच्या जीवनाचा सारा ओलावा, त्या हमामच्या दोन वड्यांबरोबर फुकट मिळणाऱ्या तिसऱ्या वडीपुरता कसाबसा टिकतो, त्याला एका मर्सिडिज-बेन्झ बरोबर मिळणारा डबल-डोअर फ़्रिज काय झेपणार, कपाळ?
मधेच कुठेतरी आपल्या मुलाबरोबर खिशातले पैसे आणि चित्रपटाभोवतीचे मध्यांतर यांचे गणित सोडवणारे वडिल दिसतात, तर कुठेतरी कडेवरच्या रडणाऱ्या बाळापेक्षा आजुबाजुकडुन होणाऱ्या कुत्सित कटाक्षांनी कावरीबावरी झालेली आई नजरेत भरते. बाकी ठाणा-डोंबिवलीच्या मासळीबाजारातसुद्धा साखरझोपेत पेंगणारे गुटगुटीत बालक, मॉलच्या निरवं थंडाईत घुसल्याघुसल्या कसे काय जागे होते, हा एक यक्षप्रश्नच आहे.
तर अशा या असंख्य लाटांवरती हा (वि)चित्रानुभव हिंदोळत पुढे सरकतो आणि येणाऱ्या प्रत्येक लाटेबरोबर नावेत उडणारे ते आठवणींचे चार-चार शिंतोडे आम्ही सहज टिपत राहतो. मग हळुच केव्हातरी पडद्याबाजुचं दार उघडतं, त्या दारातून व्यवस्थापक नावाचे कुणीतरी आत शिरते, झालेल्या उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त करते, आणि चित्रपट सुरु होत असल्याची घोषणा करुन जाते. पण कमळाच्या पानांवरले मोती टिपणाऱ्या आम्हाला चिखलात पाय बुडल्याची तमा नसते.
पुढे मग पटलावरील चित्र धावू लागते, आणि इतकावेळ गोंगाटात भारंभार नटलेला जिवंतपणा मालवलेल्या दिव्यांबरोबर अंधारात विरून जातो. मग प्रत्येकजण वेगळा असतो.... ज्याचा-त्याचा असतो... पडद्यावरच्या निर्गुण सावल्या त्याला हळुहळु आपल्याशा वाटू लागतात आणि त्याचवेळी शेजारी बसलेला त्याचा सगुण सोबतीमात्र त्याला परका झालेला असतो.
Friday, October 06, 2006
सुमित्रा
असो... तर ही सुमित्रा मला अजूनपर्यंत काही भेटलेली नाही. आणि आता चुकून-माकून समोर आलीच, तर तिचे स्वागतागत्यादी सोपस्कार पार पडतील अशी माझ्या मनाची तयारीही वाटत नाही. कारण, आजघडीला सुमित्रा नाव असलेली षोडशकन्या म्हणजे, पहाटे लवकर उठणारी, थोरामोठ्यांचा शुभाशिर्वाद आणि देवादिकांची षोडशोपचारे पूजाअर्चा घडल्याविना घोटभर पाणीही न पिणारी, डोक्यावर किमान अर्धा लिटर तेलाची उदकशांत घालून तो केशसंभार करकचून पिळून घेणारी, घरापासून कॉलेजात जाईपर्यंत नाकाचा मार्गिकेशी असलेला कोन जराही बदलू न देणारी आणि चुकून जर कोणी ओळख देण्याचे अवलक्षण घडवलेच, तर तेवढ्याच तिऱ्हाईतपणे चेहऱ्यावरच्या मुद्रीत हास्य नामक कोळिष्टकाने परतवणारी, किंवा त्याच्याही पुढे जावून एखाद्यच्या good morning वाचक अवमानाला "सुप्रभात" असा घरचा आहेर देत टोलवणारी, सकलगुणसंपन्न धर्माचारिणी एकमेवाद्वितीयाच माझ्या डोळ्यासमोर येते.
मग अशी ही सुमित्रा रोज वेळेवर कॉलेजात जाते. तिथे सामान्यतः एखाद्या कोपऱ्यात सापडणाऱ्या कट्टा नामक कर्मभुमी असलेल्या, आकाश हेच पांघरुण आणि धरणी म्हणजे पायघडी समजणाऱ्या आणि या दोहोंच्या मध्ये त्या विश्वेश्वराने निर्माण केलेल्या तितक्याच मौल्यवान विषमलिंगी विश्वचा आस्वाद डोळे भरभरुन लुटणाऱ्या, "मवाली" हि उपाधि degree म्हणून धारण केलेल्या शैक्षणिकदृष्ट्या निरुपद्रवी विद्यार्थिसमुहाला जातायेता शिव्यांचा रतीब घालते. आणि तिच्या भक्तांपैकी एखादा चुकून त्यांच्यापासून दहाएक मैलांच्या परिघातही आढळल्यास पुढील दोनएक तास "आपण कशासाठी कॉलेजात येतो, आपले आईवडिल आपल्याला इथे का पाठवतात, त्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात, प्रसंगी स्वतःच्या इच्छाआकांक्षांना कसे गालबोट लाववे लागते... वगैरे वगैरे" उपदेशाचे चार शब्द ऐकवते. या कर्यक्रमाच्या शेवटी "यापुढे असे झाल्यास" कोणत्या परिणामांना सामोरे जावे लगेल याची उजळणी करायलाही विसरत नाही.
या सुमित्रेला दर परिक्षेत न चुकता "पैकीच्यापैकी" मार्क कसे मिळतात, हिच्याकडेच प्राध्यापकाने अगदी आडवळणाला जाऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा तितक्याच सहजपणे कशी सापडतात, तीला भाषेसारख्या अवजड-बोजड विषयांत रुची कुठून आणि कशी निर्माण होते आणि आमच्यासारख्या पामरांच्या प्रकृतिला वर्ज्य असलेले अलंकारिक शब्द हिच्या निबंधात "पैशाला पन्नास" मिळत असल्यासारखे कसे काय मुक्तापणे विहरत असतात, वक्तृत्व स्पर्धेत हिचे भाषण सुरु होण्यापूर्वीच हिचा पहिल्या क्रमांकाचे परितोषिक कसे काय मिळते आणि याच महात्म्याच्या अवतीभवती वसलेल्या इतरेजनात मात्र या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची कुवतही परमेश्वराने पदरी पडू देऊ नये या विरोधाभासाचेच जास्ती आश्चर्य वाटते.
तर अशी ही सुमित्रा म्हणजे माझ्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने पहिलेवहीले आणि शेवटुन दुसरे एकपात्री प्रेमप्रकरण आसावे. अशा सुतासारख्या सरळसोट प्रकरणाच्या बाबतीत "पुढे काय झाले" यापेक्षा "पुढे काही झाले का" हाच प्रश्न जास्ती संयुक्तिक ठरतो. आणि अशा व्यक्तिच्या प्रेमात पडलेल्यांना "इतक्या सोप्या तलमी अयुष्यात" क्षणिक का होईना पण गुंता निर्माण केल्याचा अभिमान मिरविण्याचा आनंद लुटता येतो. "सुमित्रा" नामक ही एक गुंतवळ तुम्हा स्नेह्यांपुढे झटकताना मलाही अगदी तसाच आनंद होतो आहे.
असो... सुमित्रेला आज ओळख न दाखवण्यामागे आणखीही एक (आणि कदाचित अधिक महत्वाचे) कारण आहे. पण तो खुलासा नंतर कधीतरी. एवढे मात्र नक्की, की आज सुमित्राच काय पण खुद्द ऐश्वर्यालही ओळख द्यावी या मनस्थितीत मी नाही.